Home महाराष्ट्र Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

0
Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळी यांच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही शिवसेनेच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदेंची कांबळी कुटुंबीयांनी घेतली भेट

विनोद कांबळी यांनी पत्नी अँड्रिया हेविट आणि मुलांसह मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एमसीएचे प्रसिद्ध पीच क्युरेटर नदीम मेमनही उपस्थित होते. या भेटीदरम्यान कांबळी यांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या आणि उपचारांसाठी येणाऱ्या अडचणी शिंदे यांच्यासमोर मांडल्या.

ज्युपिटर रुग्णालयात होणार उपचार

विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याने त्यांना गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांची स्मरणशक्ती कमी होण्यासह इतर त्रासही वाढले आहेत. भविष्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याने त्यांना दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात कांबळी यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार करण्यात येतील, असे आश्वासन दिले. पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या उपचारांची जबाबदारी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

https://www.prahaar.in/2026/11/29/when-will-the-25th-installment-of-pm-kisan-be-released-important-update-regarding-the-month-of-february/

दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार

कांबळी यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचीही काळजी घेत शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन दिले. मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, विनोद कांबळी यांचा मुलगा जीजस कांबळी हा देखील वडिलांप्रमाणे डावखुरा क्रिकेटपटू आहे. तो सध्या शालेय स्तरावर क्रिकेट खेळत आहे. त्याला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

कांबळी म्हणाले, चिंता दूर झाली !

एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विनोद कांबळी यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या उपचारांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे, याची चिंता होती. मात्र, शिंदे यांनी मदतीचा हात दिल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे कांबळी यांनी सांगितले. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने एकेकाळी चाहत्यांची मने जिंकणाऱ्या विनोद कांबळी यांना आता कठीण काळात मदतीचा हात मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here