India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आकाशदीपच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
हेल्मेटवर दोनदा चेंडू आदळला
क्राइस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आकाशदीप फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. भारताच्या पहिल्या डावातील 53 व्या षटकात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट लेंथचा होता. त्यावर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत थेट आकाशदीपच्या हेल्मेटच्या ग्रिलवर आदळला.
यानंतर त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू आकाशदीपच्या हेल्मेटला लागला. दुसऱ्यांदा झालेला आघात अधिक जोरदार होता. त्यानंतर भारतीय संघाचा फिजिओ मैदानात आला आणि त्याने आकाशदीपची तपासणी केली. मात्र, तपासणीनंतरही आकाशदीपने फलंदाजी सुरू ठेवली आणि संघासाठी महत्त्वपूर्ण 29 धावांचे योगदान दिले.
𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲
Akash Deep got hit on his helmet while batting on Day 3 of the second Test against New Zealand in Christchurch. Prasidh Krishna has replaced him as a concussion substitute.
The BCCI Medical Team is monitoring him.
#TeamIndia | #NZvIND
— BCCI (@BCCI) November 29, 2026
पहिल्या डावात घेतल्या होत्या 5 विकेट
आकाशदीपचे दुसऱ्या कसोटीतून बाहेर होणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पहिल्या डावात तो भारताचा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला होता. त्याने 31.3 षटके गोलंदाजी करत 99 धावा देऊन तब्बल 5 विकेट घेतल्या होत्या. टॉम लॅथम, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन आणि मॅट हेन्री यांना त्याने बाद केले होते.
प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी
आकाशदीपच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने आपल्या प्रभावी गोलंदाजीने लक्ष वेधले होते. त्याने त्या सामन्यात एकूण तीन विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीसाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता आकाशदीपच्या दुखापतीमुळे त्याला संधी मिळाली आहे.
दरम्यान, BCCI च्या वैद्यकीय पथकाकडून आकाशदीपच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जात आहे. त्याच्या दुखापतीबाबत पुढील अपडेटकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.