Home देश Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

0
Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स विभाग इन्स्टामार्टमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी ३४० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामकाज अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्यासाठी ही पुनर्रचना केली जात असल्याचं सांगण्यात येतंय. जगभरात सध्या अनेक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची गरज पुन्हा तपासली जात आहे. खर्च कमी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. भारतातील क्विक कॉमर्स क्षेत्रातही ही स्पर्धा खूप तीव्र झाली आहे.

स्विगीचा इन्स्टामार्ट, इटरनलच्या मालकीचा ब्लिंकिट आणि झेप्टो यांच्यात डार्क स्टोअरचं जाळं वाढवणं, जलद डिलिव्हरी देणं आणि बाजारातील हिस्सा मिळवण्यासाठी चुरशीची लढाई सुरू आहे. या तीव्र स्पर्धेमुळे कंपन्यांवर कार्यक्षमता वाढवण्याचा आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा दबाव वाढला आहे. नफा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करताना खर्च कमी करणं गरजेचं झालं आहे. त्याचाच भाग म्हणून स्विगीने ही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुनर्रचनेमुळे प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्विगीने मदत पॅकेज जाहीर केलं आहे. यामध्ये सेव्हरन्स पेमेंट, वैधानिक देयके आणि मे २०२७ पर्यंत वाढीव आरोग्य विमा सुविधा देण्यात येणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली असली तरी त्यांचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. स्विगीने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

https://www.prahaar.in/2026/11/27/mpsc-group-c-exam-2026-extension-of-deadline-for-mpsc-group-c-exam-applications-applications-can-now-be-submitted-until-november-29/

इन्स्टामार्टचा तोटा वाढत असल्याचंही समोर आलं आहे. सप्टेंबर तिमाहीत इन्स्टामार्टचा समायोजित तोटा ८.४९ अब्ज रुपयांवरून ८.९५ अब्ज रुपयांवर पोहोचला आहे. ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू वाढली असली तरी तोटा कमी झालेला नाही. मात्र कंपनीचं म्हणणं आहे की, क्विक कॉमर्स विभागाचा तोटा आता शिखरावर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीत समायोजित मार्जिनमध्ये सुमारे १०० बेसिस पॉईंट्सची सुधारणा होईल, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. नवीन स्टोअर वेगाने वाढवण्यापेक्षा सध्याच्या बाजारपेठेतच अधिक मजबूत होऊन वेअरहाऊसची कार्यक्षमता आणि नफा वाढवण्यावर कंपनी भर देणार आहे. स्विगीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, डिलिव्हरी पार्टनर वगळता कंपनीकडे सुमारे ९,०४७ कर्मचारी आहेत. इन्स्टामार्टमधील कर्मचाऱ्यांची स्वतंत्र आकडेवारी कंपनीने जाहीर केलेली नाही. या कपातीनंतर इन्स्टामार्टच्या कामकाजावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here