Home महामुंबई Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

0
Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाने २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ‘बांद्रा स्टेशन महोत्सव २०२६’ आयोजित केला आहे. स्टेशनच्या स्थापत्य कला, इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचा जागर या महोत्सवातून केला जात आहे. २८ नोव्हेंबर १८६४ रोजी वांद्रे उपनगरीय स्टेशनचं उद्घाटन झालं होतं. त्या ऐतिहासिक दिवसाच्या १६२ व्या वर्धापन दिनानिमित्त हा तीन दिवसीय सोहळा रंगतोय. शुक्रवारी या महोत्सवाचं उद्घाटन झालं. राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई आणि मुंबई सेंट्रल मंडळाचे मंडल रेल प्रबंधक पंकज सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वरिष्ठ रेल्वे अधिकारीही उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात रेल्वे सुरक्षा बलाच्या फ्लॅग मार्चने झाली.

यानंतर वांद्रे स्टेशनच्या वारशाला समर्पित ‘द स्टेशन दॅट मेड हिस्ट्री’ या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर नुक्कड नाटक आणि पश्चिम रेल्वेच्या सांस्कृतिक टीमचा संगीतमय कार्यक्रम रंगला. याने उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवात वांद्रे स्टेशनच्या इतिहासाची झलक दाखवणारी विशेष हेरिटेज फोटो प्रदर्शनी मांडण्यात आली आहे. दुर्मिळ जुन्या छायाचित्रांमधून स्टेशनचा भूतकाळ आणि त्याच्या विकासाचा प्रवास पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे मुख्य आकर्षण ठरलं.दुसऱ्या दिवशीही सोहळा सुरूच राहणार आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता होणारा ‘आफ्रिकन आर्ट ऑफ ड्रमिंग’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अनुभव देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. समारोपाच्या दिवशीही विविध सांस्कृतिक आणि हेरिटेज उपक्रम होणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/27/special-block-by-central-railway-for-work-at-the-panvel-kalamboli-coaching-complex-some-express-trains-to-run-late/

जनसहभाग वाढावा म्हणून ‘बांद्रा स्टेशन’ या संकल्पनेवर आधारित कला आणि छायाचित्रण स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे. तसंच आगंतुकांसाठी खास सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. तिथे नागरिक या सोहळ्याच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करू शकतात. वांद्रे रेल्वे स्टेशन हे मुंबईतील सर्वात सुंदर उपनगरीय स्टेशनांपैकी एक आहे. १९ व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैली आणि आकर्षक छतांच्या रचनेमुळे त्याला ग्रेड-१ हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. या महोत्सवातून स्टेशनचं ऐतिहासिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि रेल्वेच्या वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणं, हा पश्चिम रेल्वेचा उद्देश आहे.हा महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, नागरिक, रेल्वेप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, असं आवाहन पश्चिम रेल्वेने केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here