Home ब्रेकिंग न्यूज पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुंबईत ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालय

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुंबईत ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालय

0
पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुंबईत ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालय

मुंबई : पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेले पहिले आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालय मुंबईतील लोअर परळ येथील मफतलाल टॉवरमध्ये सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान आणि नियोजित भेटीच्या माध्यमातून मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोनशिलेचे अनावरण करून आणि फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाची पाहणी करून तेथील सुविधांची माहिती घेतली.

या कार्यालयात शासकीय नोंदणी सेवा, डिजिटल तंत्रज्ञान, व्यावसायिक ग्राहक सेवा आणि आधुनिक पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियोजित भेटीनुसार नोंदणी प्रक्रिया राबविणे, तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती, पारदर्शक सेवा, प्रतीक्षा कालावधी कमी करणे आणि नोंदणीच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना मार्गदर्शन करणे, ही या कार्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/27/mill-workers-who-moved-to-vasai-virar-and-karjat-will-be-brought-back-to-mumbai-chief-minister-devendra-fadnavis-gives-assurance/

नोंदणीसाठी नियोजित भेटीच्या दिवशी पक्षकारांना मूळ कागदपत्रे, ओळखपत्रे, भेटीची पुष्टी आणि शुल्क भरल्याच्या पावत्या घेऊन कार्यालयात उपस्थित राहावे लागेल. प्रवेशापूर्वी सुरक्षा कर्मचारी भेटीची वेळ आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. त्यानंतर स्वागत कक्षातील कर्मचारी प्राथमिक तपासणी करून रांग व्यवस्थापन प्रणालीद्वारे टोकन देतील.

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांचे अनुक्रमणीकरण, पृष्ठांकन, मुद्रांकन आणि स्कॅनिंग केले जाईल. त्यानंतर ही कागदपत्रे शासकीय नोंदणी प्रणालीमध्ये अपलोड केली जातील. त्यामुळे अभिलेखांचे सुरक्षित व्यवस्थापन आणि डिजिटल जतन होण्यासह त्यांचा मागोवा घेणे व भविष्यात आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. स्कॅनिंग आणि गुणवत्ता तपासणी पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत दस्तऐवज आणि पोचपावती नागरिकांना रीतसर पोच घेऊन दिली जाईल.

स्वागत कक्षासह प्रतीक्षा कक्षाची सुविधा

कार्यालयात स्वतंत्र स्वागत कक्ष, नागरिक सहायता सेवा, रांग व्यवस्थापन यंत्रणा आणि आरामदायी प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांमुळे नागरिकांना नोंदणीसाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल. तसेच मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here