नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणातील जप्त केलेला सर्व मुद्देमाल १ डिसेंबरपूर्वी सत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश गंगापूर पोलिसांना देण्यात आले आहेत.
डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि सहकलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या या गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायालयात होणे आवश्यक असल्याने हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम २३० अंतर्गत संशयितांना दोषारोपपत्र आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हे प्रकरण रीतसर जिल्हा व सत्र न्यायालयाकडे पाठवले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/nashik-crimefiring-incident-using-a-country-made-pistol-in-broad-daylight-in-niphad-33-year-old-man-critically-injured/
डिजिटल पुरावे ठरणार महत्त्वाचे
या खटल्यात पोलिसांनी गोळा केलेल्या डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी दोन्ही संशयित डॉक्टरांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच, मोबाईलमधील चॅटिंग, कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक अहवाल यांचाही पुराव्यांमध्ये समावेश आहे.
न्यायालयाने १ डिसेंबरपूर्वी सर्व जप्त मुद्देमाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने आता पोलिसांना तपासातील पुरावे सत्र न्यायालयात सादर करावे लागणार आहेत. आगामी सुनावणीदरम्यान डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात आता सत्र न्यायालयात कोणते पुरावे समोर येतात आणि सुनावणीदरम्यान काय घडामोडी घडतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.