भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी गोळीबारात ठार केले. शुक्रवारी पहाटे पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर ही घटना घडली. याबाबत सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
https://www.prahaar.in/2026/11/27/nashik-crimefiring-incident-using-a-country-made-pistol-in-broad-daylight-in-niphad-33-year-old-man-critically-injured/
पहाटे 2 वाजता घुसखोरीचा प्रयत्न
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोटमधील उझ नदीच्या काठावरील पहाडीपूर सीमा चौकी परिसरात पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 20 वर्षांचा एक पाकिस्तानी नागरिक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले.
जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, इशारा देऊनही तो आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने पुढे जात राहिला. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. या कारवाईत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
स्मार्ट कुंपणाने सुरक्षित असलेला परिसर
घटना घडलेला भाग उझ नदीच्या काठावर आहे. या परिसरात तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने उभारण्यात आलेले स्मार्ट कुंपण आहे. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी बीएसएफकडे आहे. सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जवानांकडून नियमित गस्त आणि देखरेख केली जाते.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती आहे.