नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैताळे गावातील पाणीपुरवठ्याच्या टाकीजवळ भरदिवसा गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. या घटनेत श्रावण सुरेश पिंपळे (वय अंदाजे ३३) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गोळीबारानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नैताळे गावातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली श्रावण पिंपळे आणि राहुल वाघमारे हे दोघे थांबले होते. यावेळी संभाजीनगर येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. याचदरम्यान अचानक गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
या गोळीबारात श्रावण पिंपळे याच्या कमरेजवळ पाठीमागील बाजूस गोळी लागली. गोळीबारानंतर त्याला तातडीने निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारांसाठी नाशिकमधील मेडिग्राम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/asked-someone-not-to-smoke-and-got-attacked-with-a-knife-a-shocking-incident-at-thakurli-station/
निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे अन्वेषण पथक आणि फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली असून, गोळीबाराशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात अहिल्यानगर येथील राहुल वाघमारे याच्यावर गोळीबाराचा संशय असून, तो घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
नैताळेसारख्या गावात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारामागील नेमके कारण काय, संभाजीनगरमधील गुन्ह्याचा या घटनेशी काय संबंध आहे आणि गोळीबारासाठी वापरण्यात आलेला गावठी कट्टा कुठून आणण्यात आला, याचा तपास निफाड पोलीस करत आहेत.
दरम्यान, परिसरात वारंवार घडणाऱ्या लहान-मोठ्या गुन्हेगारी घटनांमुळे आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गावातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे निफाड तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.