Home महाराष्ट्र नाशिक Nashik : द्वारका सर्कलला मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा, द्वारका इंटरचेंजचे 80 टक्के काम पूर्ण

Nashik : द्वारका सर्कलला मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा, द्वारका इंटरचेंजचे 80 टक्के काम पूर्ण

0
Nashik : द्वारका सर्कलला मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा, द्वारका इंटरचेंजचे 80 टक्के काम पूर्ण

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांना वेग आला आहे. अशातच पुणे रोडवरून नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या इंटरचेंज प्रकल्पातील १०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग जानेवारीअखेर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई आणि धुळे बाजूकडील वाहनधारकांना कुंभमेळ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. (Nashik News)

द्वारका इंटरचेंजचे 80 टक्के काम पूर्ण

द्वारका इंटरचेंज प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाखाली मर्यादित जागा आणि अभियांत्रिकीविषयक अडचणी असतानाही महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून (Maharashtra State Infrastructure Development Corporation) हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पातील एकूण ५६३ मीटर लांबीच्या इंटरचेंजचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे बाजूकडील रॅम्प आणि भुयारी मार्गाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यातील ५३ मीटर लांबीचे बांधकामही पूर्ण करण्यात आले आहे. (Nashik News)

https://www.prahaar.in/2026/11/27/nashik-crime-stockpile-of-explosives-found-in-a-tin-shed-in-nashik-200-gelatin-sticks-detonators-and-batteries-seized/

द्वारका सर्कलचा भुयारी मार्ग जानेवारीत सुरू होणार ? 

सध्या बांधकामातील काँक्रीट अधिक मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेली क्युरिंग प्रक्रिया सुरू आहे. तसेच नाशिक बाजूकडील उर्वरित कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. काँक्रीटच्या मजबुतीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारीअखेर मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुणे रोडवरून नाशिकमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मुंबई आणि धुळे बाजूकडील वाहनधारकांसाठी मात्र अद्याप प्रतीक्षा कायम आहे. या दोन्ही दिशांकडील यू-टर्नची कामे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही कामे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. परिणामी, या मार्गांवरील वाहनधारकांना कुंभमेळ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. (Nashik News)

एकीकडे पुणे रोडवरील भुयारी मार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा होत असताना दुसरीकडे मुंबई आणि धुळे बाजूकडील यू-टर्नची कामे रखडणार असल्याने सिंहस्थाच्या काळात द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक व्यवस्थेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here