Home मुख्य पोस्ट शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर काय घडणार?

शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर काय घडणार?

0
शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर काय घडणार?
(Photo: ANI)

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. संसदेच्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात सर्व खासदारांनी उपस्थित राहावे आणि पक्ष जी भूमिका घेईल, त्याला पाठिंबा द्यावा, असे निर्देश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत. पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जारी केला आहे. दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत पक्षाच्या भूमिकेला बहुतांश जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता असल्याने संसदेत दोनतृतीयांश बहुमत महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वीही संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मांडण्यात आले होते; मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी या विधेयकावर कोणते पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/27/womens-reservation-delimitation-bill-lok-sabha-nda-number-game-360/

या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची गुरुवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह विविध विभागांतील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत पक्षाने घाईघाईने भूमिका घेऊ नये, तर त्यातील तरतुदी आणि संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे.

बैठकीत काही जिल्हाध्यक्षांनी अनेक मतदारसंघांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मतदारसंघांचे विभाजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विधेयकाबाबत शरद पवार आणि पक्षाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याला पाठिंबा देण्याची तयारी बहुतांश जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दर्शविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नेतृत्वाने अंतिम निर्णय घेतल्यास तो मान्य असेल, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. मात्र, विधेयकातील तरतुदी आणि त्याचे राज्यांवरील संभाव्य परिणाम तपासल्यानंतरच पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे वरिष्ठांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.

यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर भूमिका मांडली होती. सर्व राज्यांना समान पद्धतीने जागा मिळणार असतील, तर विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करता येईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे विशेष अधिवेशनात विधेयक मांडले गेल्यास शरद पवार गट त्याला पाठिंबा देणार की काही अटी मांडणार, याबाबत उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here