संविधान दिनाच्या निमित्ताने ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हे अभियान रायगडावर आज पार पडलं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमातून गडसंवर्धनाचा जोरदार संदेश दिला. सकाळी रायगडावर पोहोचताच शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर हिरकणीवाडीत झालेल्या कार्यक्रमात ते स्वच्छता दूतांशी बोलले, त्यांचं काम जवळून समजून घेतलं. पाचाड-महाड रस्त्यावरच्या वनराई बंधाऱ्यांचीही त्यांनी पाहणी केली. बोलताना शिंदे म्हणाले, शिवरायांनी फक्त किल्ले बांधले नाहीत, तर एक संपूर्ण व्यवस्था उभी केली. किल्ल्यावर पाणी कसं राहील, धान्य कुठे साठवायचं, बाजारपेठ कशी असेल, शत्रूपासून संरक्षण कसं करायचं, याचं सगळं नियोजन त्यांनी केलं होतं. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांनी राज्य केलं. आजच्या तरुणांनी हीच दूरदृष्टी शिकायला हवी.
शिवरायांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान, दोन्ही एकाच विचारावर उभे आहेत – न्याय, समानता आणि लोकशाही. संविधानामुळेच सामान्य घरातला मुलगा मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. संविधान धोक्यात आहे, असं सांगत काही लोक मोर्चे काढत आहेत, पण हा फक्त अपप्रचार आहे. 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनीच संविधान दिनाला राष्ट्रीय ओळख दिली, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. एका आठ वर्षांच्या चिमुकलीने 218 गड फिरून संवर्धनाबद्दल केलेल्या सूचनांचं शिंदे यांनी खास कौतुक केलं. गडांवरचा प्लास्टिक कचरा, अतिक्रमणं, प्रदूषण हे थांबवलंच पाहिजे, असं ते म्हणाले. फक्त सरकारने नाही, तर लोकांनी पुढे येऊन गड स्वच्छ ठेवले पाहिजेत. वृक्षारोपण, सौरऊर्जा, पाणी व्यवस्थापन यातही लोकसहभाग हवा.
https://www.prahaar.in/2026/11/26/ai-technology-to-be-used-to-prevent-accidents-on-the-old-pune-mumbai-highway-funds-of-rs-18-40-lakh-sanctioned/
ग्रामीण भागातला प्लास्टिक कचरा, नद्यांचं प्रदूषण हे मोठे प्रश्न आहेत. स्थानिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांसाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसारख्या गोष्टींना मदत मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या, सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहणं हेच सरकारचं काम आहे. गडसंवर्धनाचं हे अभियान फक्त एका कार्यक्रमापुरतं न राहता लोकचळवळ व्हावी. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर, शिवसैनिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.