Home ब्रेकिंग न्यूज Auto Rickshaw Scheme : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा व्यवसायाची संधी; 5 वर्षांत 1 लाख रिक्षांचे वाटप

Auto Rickshaw Scheme : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा व्यवसायाची संधी; 5 वर्षांत 1 लाख रिक्षांचे वाटप

0
Auto Rickshaw Scheme : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा व्यवसायाची संधी; 5 वर्षांत 1 लाख रिक्षांचे वाटप

मुंबई : दुष्काळ, शेतीमालाला कमी भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे. ‘अनाथांचा नाथ… दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ अंतर्गत 2027 ते 2031 या पाच वर्षांत 1 लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) ही माहिती दिली.

https://www.prahaar.in/2026/11/26/mega-recruitment-drive-at-nashik-municipal-corporation-ahead-of-the-simhastha-kumbh-mela-application-process-underway-for-212-posts-check-eligibility-criteria-and-the-application-deadline/

9 फेब्रुवारी 2027 पासून रिक्षांचे वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 फेब्रुवारी 2027 रोजी पात्र शेतकऱ्यांना रिक्षांच्या चाव्या देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राबवली जाणार आहे.

या योजनेचा लाभ शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या 310 पेक्षा अधिक तालुक्यांतील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

90 टक्के बँक कर्ज, 10 टक्के अनुदान

रिक्षा खरेदीसाठी वाहनाच्या एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम कल्याणकारी मंडळाकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. उर्वरित 90 टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँका, अनुसूचित बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे शेतकरी कुटुंबांना स्वतःचा रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

पहिल्या वर्षी 20 हजार शेतकऱ्यांना लाभ

योजनेच्या पहिल्या वर्षात 20 हजार पात्र लाभार्थ्यांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी 60 लाभार्थ्यांची निवड करण्याचे नियोजन आहे. एखाद्या तालुक्यात पात्र अर्जदारांची संख्या कमी असल्यास उर्वरित रिक्षा त्याच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

लॉटरी पद्धतीने होणार लाभार्थ्यांची निवड

योजनेसाठी कल्याणकारी मंडळाकडून जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले जातील. प्राप्त अर्जांची कागदपत्रांच्या आधारे छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर संगणकीय लॉटरी पद्धतीने अंतिम निवड होईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव कर्जमंजुरीसाठी बँकांकडे पाठवण्यात येतील. बँकेने 90 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर मंडळाकडून 10 टक्के अनुदान दिले जाईल. वाहनाची रक्कम थेट अधिकृत विक्रेत्याला अदा केली जाणार आहे.

योजनेसाठी कोण पात्र असणार?

  • लाभार्थी दुष्काळग्रस्त क्षेत्रातील अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील पात्र सदस्य असावा.
  • संबंधित कुटुंबाच्या नावावर शेती असल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
  • यापूर्वी अशाच स्वरूपाच्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • वाहन चालविण्याचा वैध परवाना किंवा तो मिळवण्याची नियमानुसार पात्रता असावी.
  • बँकेच्या कर्जमंजुरीसाठी आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील.

या योजनेमुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण आणि निमशहरी भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here