पुण्यात कोर्ट परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने शहर हादरलेले असतानाच, आता मुंबईतही गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या पी सी जैन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री 7 वाजून 31 मिनिटांची आहे. दोन हल्लेखोर एका पल्सर बाईकवरून वांद्रे दिशेकडून आले. त्यांनी शोभा हॉटेलजवळून यू-टर्न मारला आणि थेट दुकानासमोर बाईक थांबवली. दोघांनीही हेल्मेट घातलं होतं. दुकानासमोर येताच त्यांनी दुकानाच्या दिशेने 2 राऊंड फायर केले. त्यावेळी दुकानदार स्वतः दुकानात उपस्थित होता. गोळ्या थेट त्याच्या दिशेने झाडण्यात आल्या. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर त्याच पल्सर बाईकवर बसून माहीमकडे जाणाऱ्या रस्त्याने पळून गेले. घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आहे. गोळीबारात दुकानाच्या काचा पूर्णपणे फुटल्या आहेत. दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या पोलिसांनी दुकान बंद केलं असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. हा हल्ला लुटीच्या उद्देशाने होता की पूर्ववैमनस्यातून, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. भर गर्दीच्या, वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. हल्लेखोरांचा माग काढून त्यांना पकडणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
बातमी अपडेट होत आहे.