मुंबई : तब्बल 44 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं बंगाली डिस्को गाणं आज पुन्हा जगभर चर्चेत आलं आहे. 1982 मध्ये रिलीज झालेलं गायिका रुपा बिस्वास सेन यांचं ‘आज शनिवार’ हे गाणं बहुप्रतीक्षित व्हिडिओ गेम Grand Theft Auto 6 (GTA 6) च्या रेडिओ साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. गेममधील Worldwide FM या रेडिओ स्टेशनवर हे गाणं ऐकायला मिळत असून, जुन्या भारतीय संगीताला नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची अनपेक्षित संधी मिळाली आहे.
GTA 6 मध्ये आपल्या गाण्याला स्थान मिळाल्याची माहिती समजल्यानंतर रुपा बिस्वास सेन यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला. अनेक दशकांनंतर आपलं गाणं जगभरातील गेमर्स ऐकत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आणि चाहत्यांचे आभार मानले. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की, ‘आज मी खूप आनंदी आहे. काल मला समजलं की माझं आज शनिवार हे गाणं GTA 6 मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. एका कलाकारासाठी यापेक्षा आणखी काय हवं? माझं संपूर्ण आयुष्य संगीतासाठी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार आणि अभिनंदन.’ या गाण्याची लोकप्रियता पुन्हा वाढल्याने रुपा यांनी आपल्या मुलाला गेमचे काही व्हिडिओ दाखवण्यास सांगितले, जेणेकरून त्यांना स्वतः या नव्या लोकप्रियतेचा अनुभव घेता येईल.
https://www.prahaar.in/2026/11/25/shocking-revelation-doctor-doom-was-marvel-masterplan-before-kang-controversy-secret-behind-robert-downey-jr-entry-revealed/
1982 मध्ये रिलीज झालं होतं ‘आज शनिवार’
‘आज शनिवार’ हे गाणं 1982 मध्ये रिलीज झालेल्या ‘Disco Jazz’ या अल्बमचा भाग होतं. सरोदवादक उस्ताद आशिष खान यांच्या निर्मितीखाली तयार झालेल्या या गाण्यात डिस्को, फंक आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा अनोखा मिलाफ करण्यात आला होता. कॅनडातील संगीतनिर्मितीदरम्यान तयार झालेल्या या गाण्यात सरोदचा वापर करण्यात आला, ज्यामुळे त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. मात्र, रिलीजच्या वेळी या गाण्याला अपेक्षित लोकप्रियता मिळाली नाही. अनेक वर्षे ते संगीतप्रेमींच्या मर्यादित वर्तुळातच राहिले. 2012 मध्ये ‘Miss Lovely’ या चित्रपटात गाण्याचा वापर झाल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढू लागली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय DJ आणि जुन्या संगीताचे संग्रहकर्ते यांच्यामध्ये या गाण्याची चर्चा सुरू झाली.
कॅनेडियन संगीतकार Dan Snaith, ज्यांना Caribou आणि Daphni या प्रोजेक्ट्समुळे ओळखले जाते, यांनीही या गाण्याला नव्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. गाण्याच्या मूळ अल्बमच्या प्रती संगीत संग्रहकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाल्या असून, काही प्रतींची किंमत 500 पौंडांपेक्षा अधिक, म्हणजेच अंदाजे 60,000 रुपये असल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये ‘Disco Jazz’ अल्बमचे पुनर्प्रकाशनही करण्यात आले.
आता GTA 6 मधील समावेशामुळे ‘आज शनिवार’ या गाण्याने पुन्हा एकदा लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला आहे. 1982 मधील बंगाली डिस्को संगीताचा प्रवास आता चित्रपट, इंटरनेट, संगीत संग्रह आणि व्हिडिओ गेमच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचला आहे.