नाशिक : सेवानिवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) हेमंत गोविंद हेमाडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता अधिक गुंतागुंतीच्या वळणावर पोहोचला आहे. सुरुवातीला मुलाचा विरोध आणि मालमत्तेच्या वादातून घडलेली घटना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या प्रकरणात आता कौटुंबिक संघर्षासोबतच व्यावसायिक संबंध आणि गेल्या चार वर्षांतील तक्रारींचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला मुलगा यश हेमाडे आणि त्याचा सासरा मल्लिकार्जुन उमदी यांच्या पोलीस कोठडीत २६ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
हेमाडे यांच्या आत्महत्येमागे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद, मालमत्तेवरील हक्काचा संघर्ष आणि शारीरिक व मानसिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी योगिता यांनी तक्रारीत केला आहे. संशयित यश हा गॅस एजन्सीचा व्यवसाय सांभाळत असून, त्याचा सासरा उमदी खासगी व्यवसाय करतो. या व्यावसायिक पार्श्वभूमीवर मालमत्तेचा वाद नेमका कशामुळे निर्माण झाला आणि त्यातून हेमाडे यांच्यावर कशा प्रकारे दबाव आणला जात होता, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, संशयित यशची पत्नी भाग्यश्री आणि हेमाडे यांची मुलगी प्रियंका कुणाल खोपकर या दोघींच्या अटकेसाठी गंगापूर पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जमीर शेख करत आहेत.
चार वर्षांपासून कौटुंबिक वाद, तक्रारींची मालिकाच
हेमाडे कुटुंबातील वादाची सुरुवात एप्रिल २०२२ मध्ये झाली होती. घरगुती वादातून मारहाण झाल्याप्रकरणी पहिला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर जून २०२३ मध्ये तोडफोड आणि धमक्यांच्या तक्रारी करण्यात आल्या. ऑक्टोबर २०२३ मध्ये हेमाडे यांच्या दिवंगत पत्नी वैशाली यांच्या श्राद्धाच्या दिवशी झालेल्या वादातून मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये घरात घुसून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर एप्रिल आणि मे २०२६ मध्येही अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. वारंवार तक्रारी होऊनही परिस्थिती नियंत्रणात का आली नाही आणि संबंधित प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही, याचाही तपासाच्या दृष्टीने विचार केला जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/25/first-they-intercepted-the-vehicle-then-threw-the-entire-family-into-a-canal-what-exactly-happened-to-the-family-from-jalgaon/
न्यायालयाचा आदेशही ठरला निष्प्रभ ?
कौटुंबिक वादातून जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत हेमंत हेमाडे आणि त्यांची पत्नी योगिता यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. २० एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने संबंधित व्यक्तींना हेमाडे यांच्या घरापासून १०० मीटरच्या परिसरात येण्यास मनाई केली होती. मात्र, हा आदेश असतानाही २७ आणि २८ एप्रिल तसेच १८ मे रोजी घराजवळ येऊन शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच २० आणि २३ मे रोजी वाहनांवर अंडी, कांदे आणि बटाटे फेकण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या घटनांसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज आणि मेसेजचे स्क्रीनशॉट पेनड्राइव्हद्वारे पोलिसांकडे सादर केल्याचे सांगण्यात आले आहे.
पुनर्विवाहानंतर मुलांकडून विरोध ?
हेमाडे यांच्या पत्नी योगिता यांनी २० नोव्हेंबर रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये नोंदणीकृत पुनर्विवाह केल्यानंतर मुलगा यश आणि मुलगी प्रियंका यांच्याकडून विरोध सुरू झाला. त्यानंतर कुटुंबातील मालमत्तेवरील हक्क सोडण्यासाठी तसेच न्यायालयात सुरू असलेले दावे आणि प्रकरणे मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्यायालयीन सुनावणीला हजर राहिल्यास तीच शेवटची तारीख ठरेल, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या मानसिक दबावामुळे हेमाडे अस्वस्थ आणि हतबल झाले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.
आत्महत्येप्रकरणी तपासाचा फोकस वाढला
हेमंत हेमाडे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. याप्रकरणी यश हेमाडे आणि त्याचा सासरा मल्लिकार्जुन उमदी यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मालमत्तेचा वाद, त्यामागील कारणे आणि इतर संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने दोघांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.