Palghar News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायगाव पूर्व येथील एका निवासी इमारतीच्या ११व्या मजल्यावरून पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. फ्लॅटबाहेरील कॉरिडॉरमध्ये एका मुलीसोबत खेळत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच या चिमुरड्याने आई गमावली होती. त्यामुळे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खेळता खेळता ११व्या मजल्यावरून पडला
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्व येथील नवकार टॉवर सोसायटीमध्ये ही घटना घडली. सहा वर्षांचा मुलगा आपल्या फ्लॅटबाहेरील कॉरिडॉरमध्ये एका मुलीसोबत खेळत होता. याचवेळी खिडकीजवळ त्याचा तोल गेला आणि तो थेट ११व्या मजल्यावरून खाली कोसळला.
खाली पडताना मुलगा आधी अग्निसुरक्षा व्यवस्थेसाठी बसवलेल्या पाइपवर आदळला आणि त्यानंतर जमिनीवर पडला. घटनेनंतर त्याला तातडीने वसई येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, या चिमुरड्याच्या आईचे अवघ्या १५ दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईच्या निधनानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला महाबळेश्वर येथील एका वसतिगृहात पाठवण्याचा विचार केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/25/first-they-intercepted-the-vehicle-then-threw-the-entire-family-into-a-canal-what-exactly-happened-to-the-family-from-jalgaon/
सोसायटीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेनंतर सोसायटीतील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. इमारतीच्या कॉरिडॉरमधील खिडक्यांना सुरक्षा जाळ्या नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. सुरक्षा जाळ्या बसवण्याची मागणी वारंवार करूनही बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. इतकेच नाही, तर सोसायटीमधील लिफ्टच्या खराब स्थितीबाबतही रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. एका विंगमधील लिफ्ट सध्या बंद असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी सोसायटी प्रशासनाकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या वडिलांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.