नाशिक : नाशिकच्या हिरावाडी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हिरावाडी रोड परिसरातील वज्रेश्वरी झोपडपट्टीतील वाल्मिकनगर येथे मंगळवारी अचानक ही आग लागली असून या आगीत सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालेय. दरम्यान आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं ?
वज्रेश्वरी झोपडपट्टीतील वाल्मिकनगर येथे आज सकाळी काही घरांना आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण करीत आजूबाजूच्या घरांनाही विळखा घातला. या आगीत एकूण सहा घरांना फटका बसला असून, घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये गाद्या, पंखे, टीव्ही यांसह अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
काही घरांमधील भांडी व इतर साहित्य वाचविण्यात नागरिकांना यश आले असून अचानक लागलेल्या या आगीमुळे मात्र रहिवाशांची मोठी धावपळ उडाली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच आजूबाजूची इतर घरे आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचविण्यात यश मिळविले.
https://www.prahaar.in/2026/11/24/nashik-ancient-temples-discovered-during-excavation-in-panchavati-remains-of-temples-including-a-nandi-and-a-shiva-linga-have-been-found/
संभाव्य मोठी दुर्घटना टळली
झोपडपट्टीतील (Slum Area) दाटीवाटीची वस्ती आणि एका घरातील सिलिंडरचा झालेला स्फोट यामुळे आग अधिक भडकण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या आगीत शांताबाई सखाराम जाधव, मीना मोरे, सुनीता जाधव, मोहन धोत्रे, आशा मिरजकर, दिलीप पवार आणि नर्मदा इंगोले आदी रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले आहे.