Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासकामे वेगाने सुरु आहेत. विकासकामांसोबतच कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंत व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना सुरु आहे. सोबतच कुंभपर्वात व्हीआयपींची देखील मांदियाळी असणार आहे. त्यामुळे या कुंभपर्वात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीनेही तयारी केली जात आहे. त्यांच्या निवासव्यवस्थेसाठी अस्तित्वातील पाच विश्रामगृहांचे नूतनीकरण, तर एका विश्रामगृहाची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे.
विश्रामगृहांसाठी 23 कोटींचा खर्च
शहरातील सिंहगड, शिवनेरी आणि रायगड या विश्रामगृहांचे गेल्या २० वर्षांपासून नूतनीकरण झालेले नाही. इमारतींमध्ये गळती आणि फर्निचर खराब झाल्याच्या तक्रारी मंत्री व लोकप्रतिनिधींकडून केल्या जात होत्या. त्र्यंबकेश्वर येथील विश्रामगृहाचीही वेगळी स्थिती नाही. अशातच आता सिंहस्थामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक येथील सिंहगड (३.२५ कोटी), शिवनेरी (पाच कोटी) आणि रायगड (दोन कोटी) या तीन विश्रामगृहांतील कक्षांच्या नूतनीकरणासाठी १०.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/23/india-anti-drone-system-a-major-leap-for-india-successful-test-of-the-indigenous-jwala-mk-1-anti-drone-missile-system/
त्र्यंबकेश्वर येथील विश्रामगृहाचे गेल्या १२ वर्षांत नूतनीकरण झालेले नाही. येथील विश्रामगृहाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या ६.४४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सिन्नर शहरातील प्राचीन गोंदेश्वर मंदिर, समृद्धी महामार्ग आणि सिंहस्थासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ लक्षात घेऊन सिन्नर येथील विश्रामगृहातील दोन कक्षांच्या नूतनीकरणासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तर इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे सहा कक्षांचे नवीन विश्रामगृह बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च पाच कोटी रुपये असून, ही सर्व कामे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या अटीवर प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. सिंहस्थाची कामे पूर्ण करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने मार्च २०२७ पर्यंतची कालमर्यादा निश्चित केली आहे. या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरसह परिसरातील शासकीय विश्रामगृहांचाही चेहरामोहरा बदलणार आहे.