आजच्या डिजिटल युगात बँकिंग, ऑनलाइन शॉपिंगपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत जवळपास सर्वच कामे इंटरनेटच्या माध्यमातून केली जातात. मात्र, ऑनलाइन सुविधांचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. आता सायबर भामटे नामांकित कंपन्या, बँका आणि सरकारी वेबसाइटची हुबेहूब नक्कल करून बनावट वेबसाइट तयार करत आहेत. या वेबसाइट दिसायला अगदी मूळ वेबसाइटसारख्याच असल्याने अनेकजण सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात.
अशा वेबसाइटवर चुकून पासवर्ड, एटीएम कार्डची माहिती किंवा ओटीपी टाकल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही वेबसाइटवर वैयक्तिक माहिती भरण्यापूर्वी ती खरी आहे की बनावट, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास ऑनलाइन फसवणूक टाळता येऊ शकते.
वेबसाइटच्या URL मध्ये HTTPS आहे का तपासा
कोणतीही वेबसाइट उघडल्यानंतर सर्वप्रथम ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये दिसणारा URL तपासा. वेबसाइटच्या लिंकची सुरुवात HTTPS ने होते की HTTP ने, याकडे लक्ष द्या. HTTPS मधील ‘S’ म्हणजे Secure. याचा अर्थ तुमचे डिव्हाइस आणि वेबसाइट यांच्यात होणाऱ्या माहितीची देवाणघेवाण एन्क्रिप्टेड असते. त्यामुळे माहिती दुसऱ्या व्यक्तीला वाचणे कठीण होते.
वेबसाइटवर फक्त HTTP दिसत असेल किंवा ब्राउझरमध्ये ‘Not Secure’ असा इशारा येत असेल, तर अशा वेबसाइटवर बँकिंग तपशील, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती टाकणे टाळा.मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा. केवळ HTTPS आहे म्हणून वेबसाइट अधिकृत किंवा सुरक्षितच आहे, असे समजू नका. सायबर गुन्हेगारदेखील HTTPS असलेल्या बनावट वेबसाइट तयार करू शकतात.
https://www.prahaar.in/2026/11/23/5682-investors-whose-money-was-stuck-in-the-nsel-scam-will-receive-a-refund/
वेबसाइटच्या नावातील स्पेलिंग काळजीपूर्वक तपासा
सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी टायपोस्क्वाटिंग (Typosquatting) या पद्धतीचा वापर करतात. यामध्ये प्रसिद्ध वेबसाइटच्या नावातील एखादे अक्षर बदलून किंवा त्याऐवजी दुसरे अक्षर अथवा अंक वापरून बनावट लिंक तयार केली जाते. उदाहरणार्थ, Amazon ची अधिकृत वेबसाइट amazon.in असताना arnazon.in किंवा amaz0n.in अशा नावाच्या बनावट लिंक तयार केल्या जाऊ शकतात. यामध्ये ‘m’ ऐवजी ‘rn’ आणि ‘o’ ऐवजी शून्य (0) वापरले जाते. घाईगडबडीत अशा छोट्या चुका अनेकांच्या लक्षात येत नाहीत.
याशिवाय वेबसाइटच्या डोमेन एक्स्टेंशनकडेही लक्ष द्या. भारतातील सरकारी वेबसाइटसाठी सामान्यतः gov.in किंवा nic.in या डोमेनचा वापर केला जातो. त्यामुळे सरकारी योजनेच्या नावाने आलेल्या संशयास्पद लिंकची अधिकृतता तपासणे आवश्यक आहे. मात्र, केवळ डोमेन एक्स्टेंशनवरून वेबसाइट खरी की खोटी, हे ठरवू नका.
WhatsApp आणि SMS वरील अनोळखी लिंकपासून सावध राहा
तुमचे बँक खाते बंद होणार आहे, केवायसी अपडेट करा, रिफंड मिळवा किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्या, अशा आशयाचे मेसेज अनेकदा मोबाइलवर येतात. या मेसेजमध्ये दिलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला बनावट वेबसाइटवर नेले जाऊ शकते. त्यामुळे WhatsApp किंवा SMS वर आलेल्या अनोळखी लिंकवर कोणतीही पडताळणी न करता क्लिक करू नका. तसेच अशा लिंकवर बँक खाते क्रमांक, कार्ड डिटेल्स, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करू नका.
Google सर्चमधील पहिल्याच लिंकवर विश्वास ठेवू नका
बँक किंवा सरकारी वेबसाइट उघडण्यासाठी अनेकजण थेट Google वर सर्च करतात. मात्र, सर्चमध्ये सर्वात वर दिसणारी लिंक अधिकृतच असेल, याची खात्री नसते. काही वेळा बनावट वेबसाइटच्या लिंक स्पॉन्सर्ड जाहिरातींच्या माध्यमातूनही दाखवल्या जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतो संबंधित वेबसाइटचा अधिकृत पत्ता ब्राउझरमध्ये स्वतः टाइप करा किंवा आधीपासून सेव्ह केलेली अधिकृत लिंक वापरा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिचा URL काळजीपूर्वक तपासा.
दरम्यान, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी केवळ वेबसाइटचा लूक पाहून विश्वास ठेवू नका. URL तपासणे, अधिकृत लिंक वापरणे आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना सतर्क राहणे या सवयी तुम्हाला सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकतात.