Home ब्रेकिंग न्यूज मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

0
मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी
Photo: Videograb

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध महिला आणि दोन मुलांसह ८ जणांना सुखरूप वाचवण्यात आलं. आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताला दुखापत झाली आहे. ही आग मुंबई अग्निशमन दलाला रात्री १२.०७ वाजता कळवण्यात आली. हीरा मंझिल नावाच्या तळमजला अधिक तीन मजली इमारतीत आग लागली होती. ही इमारत रिलायन्स सुपरमार्केटजवळील नवजीवन सोसायटीशेजारी आहे. आग दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांमध्ये पसरली होती. यामध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर आणि घरातील इतर साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दल पोहोचलं तेव्हा अनेक रहिवासी तिसऱ्या मजल्यावर आणि टेरेसवर अडकले होते.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावरून एक पुरुष आणि दोन महिला अशा तिघांना टर्नटेबल लॅडरच्या मदतीने वाचवण्यात आलं. एका वृद्ध महिलेला पहिल्या मजल्यावरून जिन्याच्या मार्गाने बाहेर काढण्यात आलं. तर चौथ्या मजल्यावरून एक पुरुष, एक महिला, एक मुलगा आणि एक मुलगी अशा चौघांना जिन्याने सुखरूप खाली आणण्यात आलं. आगीची सुरुवातीला रात्री १२.२३ वाजता लेव्हल १ म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रात्री १२.५० वाजता ती लेव्हल २ वर गेली. आग विझवण्याचं काम कित्येक तास सुरू होतं. पहाटे ५.०५ वाजता आग आटोक्यात आली. या आगीत इलेक्ट्रिक उपकरणं, लाकडी फर्निचर, पार्टिशन, कपाटं, बेड, दरवाजे, खिडक्या, सीलिंग फॅन, स्प्लिट एसी, टीव्ही, कागदपत्रं आणि घरातील इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. पहिल्या मजल्यावरून वाचवण्यात आलेल्या महिलेला पोलीस व्हॅनमधून एच.एन. रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आलं. कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं.

https://www.prahaar.in/2026/11/22/indian-couple-shot-dead-in-canada-bloody-incident-in-walmart-parking-lot/

मेमनवाडा अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ स्टेशन अधिकारी आग विझवताना जखमी झाले. त्यांच्या उजव्या तळहाताला काप लागला. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून नायर रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना टाके घालण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. घटनास्थळी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनेक पथके तैनात करण्यात आली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here