पुणे: पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना कायमच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी पुण्यामध्ये पिंक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांचा दररोजचा वाहतूक कोंडीचा त्रास मेट्रोने मोठ्या प्रमाणावर कमी केला आहे. माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवर आणखी दोन स्थानकांची भर पडणार आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बाणेर गाव (पीएमआर- 15) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर- 16) या दोन्ही महत्त्वाच्या स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास येत्या डिसेंबर महिन्यात ही दोन्ही स्थानके प्रवाशांसाठी खुली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/22/bjp-rajya-sabha-mp-ramrao-wadkute-passes-away-a-leader-who-fought-for-dhangar-reservation-is-no-more/
सीएमआरएस तपासणीचा महत्त्वाचा टप्पा
नवीन मेट्रो स्थानके आणि मार्ग सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाते. बाणेर गाव आणि बाणेर-पाषाण लिंक रोड ही दोन मेट्रो स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. या स्थानकांची सेवा सुरू होण्यापूर्वी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) आणि त्यांच्या टीमकडून ह्या दोन्हीही स्थानकांची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी केल्यानंतर त्या स्थानकांची तांत्रिक तपासणी केली जाईल. महिन्याअखेरपर्यंत या दोन्हीही स्थानकांची पाहणी केली जाणार आहे. सध्या या स्थानकांचे तपासणीपूर्वीचे मूल्यमापन सुरू आहे. मात्र, तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू होणार नाही. पथकाने पाहणीदरम्यान नोंदवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी आणखी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/22/gold-and-silver-prices-have-plummeted-a-massive-drop-from-record-highs/
स्थानकांची पायाभूत सुविधा सज्ज झाली असली तरीही, कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या निकषांनुसार प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य आहे. हे दोन्हीही टप्पे वेळेत पूर्ण झाल्यास डिसेंबरमध्ये प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करू शकतील. बाणेर गाव आणि बाणेर- पाषाण लिंक रोड ही दोन स्थानके सुरू झाल्यानंतर पिंक लाइनवरील कार्यरत स्थानकांची संख्या 17 वरून थेट 19 होणार आहे. यामुळे बाणेर, पाषाण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल. तसेच, या मार्गावरील उर्वरित चार स्थानके पीएमआर- 13, पीएमआर- 14, पीएमआर- 20 आणि पीएमआर- 22 हे चारही स्थानक जानेवारी 2027 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळांची व्यवस्थाही केली जात आहे. यासाठी एकूण 20 जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यापैकी पाच ठिकाणी वाहनतळांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जागांवरील वाहनतळांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मेट्रो स्थानकांजवळ पार्किंगची सोय उपलब्ध झाल्यामुळे खासगी वाहने घेऊन येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, स्थानकाबाहेरील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल. एकूणच, येत्या काही महिन्यांत पुण्याच्या मेट्रो प्रवासात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/22/anirudh-ravichander-kavya-maran-reception-inside-photos-vvip-guests-rajinikanth-cm-vijay-spotted/