Home देश Narendra Modi attack on Congress : “काँग्रेसने फक्त ‘गरिबी हटाव’चा जप केला, आम्ही १२ वर्षांत ५० कोटींना गरिबीतून बाहेर काढले”; वैशालीतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Narendra Modi attack on Congress : “काँग्रेसने फक्त ‘गरिबी हटाव’चा जप केला, आम्ही १२ वर्षांत ५० कोटींना गरिबीतून बाहेर काढले”; वैशालीतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

0
Narendra Modi attack on Congress : “काँग्रेसने फक्त ‘गरिबी हटाव’चा जप केला, आम्ही १२ वर्षांत ५० कोटींना गरिबीतून बाहेर काढले”; वैशालीतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात आयोजित जाहीर सभेतून काँग्रेसच्या जुन्या ‘गरिबी हटाव’ घोषणेवर जोरदार टीका केली. आपल्या सरकारच्या ठाम राजकीय इच्छाशक्ती आणि विविध कल्याणकारी योजनांमुळेच देशातील कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलले असून गरिबी कमी होण्यास मोठी मदत झाली आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितले. सभेत बोलताना मोदी म्हणाले की, “काँग्रेस पक्षाने अनेक दशके केवळ ‘गरिबी हटाव’चे नारे देण्यावरच भर दिला; मात्र आम्ही अवघ्या १२ वर्षांत ५० कोटी नागरिकांना गरिबीच्या गर्तेतून बाहेर काढून दाखवले आहे. सरकारची प्रबळ इच्छाशक्ती आणि गरिबांसाठी राबवलेल्या योजनांचेच हे फलित आहे. केंद्र सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करताना पंतप्रधान पुढे म्हणाले, “गरिबांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे करणे आणि त्यांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देणे, याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळेच गरिबीविरोधी लढाईत देशाला यश येत आहे. ८० कोटी नागरिकांना मोफत रेशन देणे, लाखो कुटुंबांना पक्की घरे देऊन सुरक्षिततेची हमी देणे आणि मोफत उपचारांची सोय करून महागड्या वैद्यकीय खर्चातून दिलासा देणे, अशी महत्त्वाची कामे आम्ही केली आहेत.”

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्तेत येण्यापूर्वीचा काळ आणि आजची स्थिती यातील फरकही पंतप्रधानांनी अधोरेखित केला. पूर्वी राज्यात केवळ गैरव्यवहार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची चर्चा व्हायची, तर आता गुंतवणुकीचा विश्वास आणि गुन्हेगारीविरोधातील कडक कारवाईची चर्चा होते, असे ते म्हणाले. “एनडीए सत्तेत येण्यापूर्वीचा काळ लक्षात घ्या—तेव्हा फक्त घोटाळ्यांचीच चर्चा असायची. आज मात्र राज्यातील गुंतवणुकीकडे लक्ष वेधले जात आहे. पूर्वी गुन्हेगारीच्या आकड्यांच्या बातम्या यायच्या; आता गुन्हेगारांवर होणाऱ्या कारवाईची चर्चा रंगते,” असे मोदींनी नमूद केले.

https://www.prahaar.in/2026/11/21/india-has-the-strength-to-confront-challenges-asserts-prime-minister-modi/

गेल्या तीन दशकांतील बिहारच्या वाटचालीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “सुमारे ३० वर्षांपूर्वी बिहारने आशा आणि विश्वासाची नवी वाट निवडली. अनेक वर्षे संकटांचा सामना करणाऱ्या बिहारला नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुशासनाची दिशा मिळाली. त्यांनी दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि आता त्यांच्या आशीर्वादाने सम्राट चौधरी व त्यांची टीम विकासाची ही घोडदौड पुढे नेत आहे.”

याच निमित्ताने हजारो कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत असताना मोदींनी दिवंगत नेते रामविलास पासवान यांचेही स्मरण केले. “माझे मित्र रामविलासजी यांचा आत्मा जिथे असेल, तिथून ते निश्चितच आपल्यावर आशीर्वादाची फुले उधळत असतील, कारण त्यांची स्वप्ने आज साकार होताना दिसत आहेत,” असे भावनिक विधान त्यांनी केले. या सभेपूर्वी पंतप्रधानांनी बिहारमधील शहरी वाहतूक अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्यासाठी वैशाली येथून १०० ‘पीएम-ईबस’ (PM-eBuses) सेवेला हिरवा झेंडा दाखवला. छठ उत्सवानंतर छठी मैयाच्या आशीर्वादाने हा ‘विकासाचा उत्सव’ साजरा होत असल्याचे सांगत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या जनतेचे आभार मानले. नवीन उपक्रमांची माहिती देताना मोदी म्हणाले, “शहरातील प्रवास अधिक सुलभ व्हावा म्हणून आज १०० आधुनिक पीएम-ईबस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हजारो गरीब कुटुंबांना त्यांच्या पक्क्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. या सर्व विकासकामांबद्दल बिहारच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन.”

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही अनेक वर्षांपासूनची पायाभूत सुविधांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि केंद्र व राज्य नेतृत्वाचे कौतुक केले. “‘डबल-इंजिन’ सरकारच्या दूरदृष्टीतून एक एक विकास प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. केंद्रात पंतप्रधान मोदी आणि राज्यात सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वामुळे आज ‘नीतीश सेतू’चे लोकार्पण होऊ शकले; स्थानिक नागरिकांची ही अनेक दशकांची मागणी होती,” असे पासवान म्हणाले. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानताना चिराग पासवान पुढे म्हणाले, “माझ्यासाठी पालकस्थानी असलेल्या नितीश कुमार यांचे या प्रकल्पामागे मोठे योगदान आहे. त्यांच्या निश्चयामुळेच आज हा पूल पूर्ण झाला आहे. ‘विकसित बिहार’शिवाय ‘विकसित भारता’चे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. पंतप्रधानांचे बिहारमधील वारंवार होणारे दौरेच त्यांची या राज्याबद्दलची बांधिलकी दाखवतात. या कार्यक्रमातून सुरू झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक मजबूत होईल, प्रदूषणात घट होईल आणि पर्यावरणस्नेही प्रवासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वैशाली दौऱ्यात पंतप्रधानांनी रस्ते, ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, जलसंपदा, शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक क्षेत्रातील सुमारे ३४,४७० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. पाटणा जिल्ह्यातील कच्ची दर्गाह आणि वैशालीतील बिदुपूर यांना जोडणारा गंगा नदीवरील सहा पदरी ‘नीतीश सेतू’ राष्ट्राला समर्पित करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) २६,९०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळाही पार पडला. गंगा नदीवर उभारलेला सहा पदरी केबल-स्टेड ‘नीतीश सेतू’ जनतेच्या सेवेत अर्पण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्पित सेवेला बिहारच्या जनतेने वाहिलेली ही एक ‘आदरांजली’ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here