Home ब्रेकिंग न्यूज Narendra Modi statement today : आव्हानांना भिडण्याची ताकद भारतामध्ये आहे; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन!

Narendra Modi statement today : आव्हानांना भिडण्याची ताकद भारतामध्ये आहे; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन!

0
Narendra Modi statement today : आव्हानांना भिडण्याची ताकद भारतामध्ये आहे; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन!

देशातील नागरिकांनी स्वतःच्या मनात निर्माण केलेली भीती आणि मर्यादांची चौकट मोडून बाहेर पडावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी केले. भारताने सेमीकंडक्टर (चिप्स) निर्मिती, गरिबी हटवणे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात जी मोठी प्रगती केली आहे, त्यावरून हे सिद्ध होते की, भारत कोणतेही कठीण आव्हान सहज पेलू शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आयआयटी खरगपूरच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त (प्लॅटिनम ज्युबिली) आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. भारत आता जुन्या आणि मर्यादित विचारांच्या पुढे गेला असल्याचे ते म्हणाले. संकटांचा सामना करण्याच्या आपल्या स्वभावाबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, “माझ्या स्वभावातच हे भिनले आहे की, मी आव्हानांना आव्हान दिल्याशिवाय राहूच शकत नाही.”

भारताने जेव्हा ‘सेमीकंडक्टर मिशन’ सुरू केले, तेव्हा अनेकांनी त्यावर शंका घेतली होती, अशी आठवण मोदींनी सांगितली. इतर देश गेल्या ५० वर्षांपासून चिप्स बनवत आहेत, आता आपण या क्षेत्रात येऊन काय करणार, असे प्रश्न विचारले गेले. पण भूतकाळात उशीर झाला म्हणून आपण गप्प बसायचे का, असा सवाल करत मोदी म्हणाले की, “आम्ही हिंमत दाखवली आणि अधिकाऱ्यांसोबत बसून योग्य नियोजन केले. त्याचा परिणाम आज दिसत आहे. अवघ्या काही वर्षांत देशात अनेक सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू झाले आहेत आणि भारत आता चिप्स परदेशात निर्यात करत आहे.” या सर्व कामात आयआयटी खरगपूरच्या माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/11/21/maherchi-sadi-sequel-if-maherchi-sadi-2-were-to-be-made-who-would-play-lakshmi-and-vicky-ajinkya-deo-suggests-names-of-actors/

तरुणांना मार्गदर्शन करताना मोदींनी सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून दिले. अनेकदा माणूस स्वतःच्याच विचारांना मर्यादा घालून घेतो. त्यामुळे आपली स्वप्ने आणि क्षमता खुंटतात. जे लोक जुन्या आणि साचलेल्या विचारांनी जगतात, ते आयुष्यात मोठी प्रगती करू शकत नाहीत. जेव्हा एखादा देश आपल्या विचारांच्या सीमा ओलांडतो, तेव्हाच त्याला स्वतःच्या खऱ्या ताकदीची जाणीव होते. भारताने गेल्या काही वर्षांत नेमके हेच करून दाखवले आहे, असे ते म्हणाले.

गरिबी निर्मूलनाच्या मुद्द्यावर बोलताना मोदींनी जुन्या सरकारांच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली. २० वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या देशात गरिबी कधीच संपणार नाही, असे मानले जायचे. लाल किल्ल्यावरून गरिबी हटावच्या घोषणा दिल्या जायच्या, पण प्रत्यक्षात त्या योजना कागदावरच राहायच्या. पुढे जेव्हा आम्ही सत्तेत आलो, तेव्हा मी लाल किल्ल्यावरून गरीबांसाठी शौचालये बांधण्याची घोषणा केली. त्यावेळी संसदेत माझी थट्टा उडवली गेली. गरीब महिला आणि मातांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी शौचालय किती महत्त्वाचे आहे, हे त्या लोकांना समजलेच नाही, अशी खंत मोदींनी व्यक्त केली.

जागतिक बँकेच्या (World Bank) एका ताज्या अहवालाचा दाखला देत पंतप्रधानांनी देशातील गरिबी वेगाने कमी झाल्याचे सांगितले. गेल्या १२ ते १३ वर्षांत भारतातील तब्बल ५० कोटी (४९.६ कोटी) लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. २०११ ते २०२३ या काळात देशातील गरिबीचे प्रमाण ५७.७ टक्क्यांवरून थेट १६.१ टक्क्यांवर आले आहे. हा खूप मोठा बदल असून, जुनी विचारसरणी बदलून काम केल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची पहिली निवडणूक होण्यापूर्वीच आयआयटी खरगपूरची स्थापना झाली होती, याची आठवण मोदींनी करून दिली. देशाचे उद्योग उभारण्यापासून ते ‘इस्रो’चे (ISRO) अवकाश संशोधन आणि अणुऊर्जा प्रकल्पांपर्यंत या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोठी कामगिरी केली आहे. तसेच, माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात भारताचे नाव मोठे करण्यात आणि जगातील मोठ्या कंपन्यांचे प्रमुख (CEO) बनण्यातही येथील विद्यार्थी आघाडीवर राहिले आहेत, असे कौतुक त्यांनी केले.

भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी देशाच्या प्रगतीचा प्रवास उलगडून दाखवला. एकेकाळी या देशात ‘स्वराज्याचे’ स्वप्न पाहिले गेले, आज हाच देश ‘आत्मनिर्भर’ होण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे. स्वराज्य ते आत्मनिर्भरता हा प्रवासच ‘विकसित भारत’ घडवण्याची खरी ताकद आहे. चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणे, जैव-तंत्रज्ञान (Bioeconomy) क्षेत्रातील वीसपट वाढ आणि नवीन स्टार्टअप्समुळे भारताचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र आज जगात चमकू लागले असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here