Home टेक्नॉलॉजी OpenAI स्मार्टफोन बाजारात उतरणार ? 2027-28 मध्ये पहिला AI फोन लॉन्च होण्याची शक्यता

OpenAI स्मार्टफोन बाजारात उतरणार ? 2027-28 मध्ये पहिला AI फोन लॉन्च होण्याची शक्यता

0
OpenAI स्मार्टफोन बाजारात उतरणार ? 2027-28 मध्ये पहिला AI फोन लॉन्च होण्याची शक्यता

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI आता स्मार्टफोन बाजारात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोनबाबत गेल्या काही काळापासून विविध दावे केले जात आहेत. अद्याप OpenAI कडून या प्रकल्पाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, चीनमधील एका नव्या अहवालामुळे या चर्चांना आणखी वेग आला आहे. या अहवालानुसार, फॉक्सकॉनची सहकारी कंपनी FIH Mobile ला OpenAI च्या स्मार्टफोन प्रकल्पाशी संबंधित ऑर्डर मिळाल्या आहेत.

FIH Mobile कडे असू शकते स्मार्टफोन निर्मितीची जबाबदारी

चीनमधील एका वृत्तपत्राने सप्लाय चेनमधील सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. त्यानुसार, FIH Mobile ला OpenAI च्या आगामी स्मार्टफोन प्रकल्पासाठी ऑर्डर मिळाल्या असून, फोनच्या असेंबलिंगची जबाबदारीही ही कंपनी सांभाळू शकते. FIH Mobile ही फॉक्सकॉनची सहकारी कंपनी असून, हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजमध्ये 02038.HK या नावाने सूचीबद्ध आहे.

विविध टेक कंपन्यांसाठी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची डिझाइनिंग, निर्मिती तसेच असेंबलिंग करण्याचा या कंपनीला अनुभव आहे. दरम्यान, ‘कैलियन प्रेस’च्या अहवालानुसार, OpenAI चा पहिला स्मार्टफोन 2027 च्या अखेरीस किंवा 2028 मध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात Luxshare Precision, Lingyi iTech आणि AAC Technologies यांसारख्या कंपन्यांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे.

https://www.prahaar.in/2026/11/21/apple-iphones-20th-anniversary-apple-prepares-to-offer-something-special-to-customers-through-the-iphone-19-and-iphone-20/

फोनमध्ये मिळणार 2nm तंत्रज्ञानाचा प्रोसेसर ?

OpenAI च्या या स्मार्टफोनच्या संभाव्य हार्डवेअरविषयीही काही महत्त्वाचे दावे समोर आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील युजर अभिषेक यादव यांनी विश्लेषक मिंग-ची कुओ यांच्या हवाल्याने या फोनच्या संभाव्य फीचर्सची माहिती शेअर केली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये 2nm तंत्रज्ञानावर आधारित कस्टम MediaTek Dimensity 9600 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, अधिक वेगवान कामगिरीसाठी LPDDR6 RAM आणि डेटा ट्रान्सफरसाठी UFS 5.0 स्टोरेज तंत्रज्ञान दिले जाऊ शकते.

या फोनमध्ये दोन NPU म्हणजेच AI प्रोसेसिंग इंजिन असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे दोन्ही इंजिन एकत्रितपणे AI संबंधित कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे हाताळू शकतात. तसेच, चांगल्या HDR सेन्सर आणि ISP तंत्रज्ञानाचाही यात समावेश असू शकतो. विशेष म्हणजे, या फोनचा कॅमेरा केवळ फोटो आणि व्हिडिओ काढण्यापुरता मर्यादित नसेल. तर आजूबाजूच्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती ओळखून त्यांचे रिअल टाइममध्ये विश्लेषण करण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो.

सामान्य स्मार्टफोनपेक्षा OpenAI चा फोन कसा असेल वेगळा ?

OpenAI च्या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये AI ला केवळ एक फीचर म्हणून नव्हे, तर संपूर्ण फोनचा मुख्य भाग म्हणून विकसित केले जाऊ शकते. सध्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये AI चा वापर फोटो एडिटिंग, व्हॉइस असिस्टंट किंवा चॅटबॉट यांसारख्या सुविधांसाठी केला जातो. मात्र, OpenAI चा भर Agentic AI वर असण्याची शक्यता आहे.

म्हणजेच, हा फोन केवळ वापरकर्त्याच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही, तर वापरकर्त्याची गरज समजून घेऊन विविध अ‍ॅप्सवर स्वतःहून कामे पूर्ण करण्यास सक्षम असू शकतो. उदाहरणार्थ, प्रवासाचे नियोजन करणे, माहिती शोधणे, वेगवेगळ्या अ‍ॅप्समधील कामे पूर्ण करणे किंवा वापरकर्त्याने दिलेल्या सूचनांनुसार अनेक टास्क पार पाडणे अशी कामे AI एजंटच्या मदतीने करता येऊ शकतात.

मात्र, या स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत आणि लॉन्चिंगची तारीख याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या या सर्व बाबी प्राथमिक अहवाल आणि लीक झालेल्या माहितीनुसारच आहेत. OpenAI प्रत्यक्षात असा स्मार्टफोन बाजारात आणते का आणि तो स्मार्टफोन वापरण्याची पद्धत कितपत बदलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here