मुंबई: मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळाच्या कसारा स्थानकावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्यामुळे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासाचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी तसेच विशेषतः महिला आणि महाविद्यालयीन तरुणींमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशा कठीण प्रसंगी कसाऱ्यामध्ये थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी येथे दाखल झाली. एसटी चालक आणि वाहकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा मोठा दिलासा मिळाला. या तत्परतेबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित कर्मचार्यांचे विशेष कौतुक केले.
https://www.prahaar.in/2026/11/21/struck-by-tragedy-while-on-duty-security-guard-dies-after-an-iron-gate-collapses-on-him/
रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे उंबरमाळी स्थानकावर प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कसारा स्थानकाजवळ थांबलेल्या एसटी बसचे चालक किरण खांडवी आणि कंडक्टर राकेश पत्की यांनी तात्काळ आगारातील स्थानक प्रमुखांशी संपर्क साधला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी बस पाठवण्याची विनंती केली. स्थानक प्रमुख पूनम देशमुख यांनी या विनंतीला दुजोरा दिल्यानंतर लालपरी तातडीने उंबरमाळी रेल्वे स्थानकाकडे रवाना करण्यात आली. रात्रीच्या वेळी एसटी बस पोहोचताच अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. बसमध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरदार महिलांची संख्या लक्षणीय होती. सुरक्षित प्रवासाची सोय झाल्याचे समजताच अनेक प्रवाशांनी आपल्या पालकांना फोन करून एसटी बस मदतीला आल्याची माहिती दिली. त्यामुळे दूरवर बसून काळजी करणाऱ्या कुटुंबीयांचीही चिंता मिटली.
https://www.prahaar.in/2026/11/21/bmc-mumbai-news-deonar-dumping-ground-mobile-highmast-controversy/
प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे मनःपूर्वक आभार मानले. त्यानंतर ही एसटी बस सर्व प्रवाशांना घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाली. घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक किरण खांडवी, कंडक्टर राकेश पत्की आणि संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले. ‘एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत आहे.’ असे त्यांनी नमूद केले. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घेणे, हीच एसटीची खरी ओळख आहे. किरण खांडवी आणि राकेश पत्की यांनी आपल्या कृतीतून कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला आहे, अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.