मुंबई : राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील अन्न उत्पादन आणि विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत तब्बल 152.65 कोटी रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, 1,688 जणांवर अटकेची कारवाई झाली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/20/msedcl-launches-major-statewide-crackdown-250-cases-of-electricity-theft-uncovered-in-3-days-revealing-misuse-worth-%e2%82%b96-27-crore/
25 हजारांहून अधिक आस्थापनांची तपासणी
FDA च्या अन्न विभागाने या सात महिन्यांत राज्यभरातील 25,514 आस्थापनांची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या 11,506 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच 1,651 परवाने निलंबित करण्यात आले.
हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि क्लब अशा एकूण 6,988 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 4,442 आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. तर 937 परवाने निलंबित आणि 23 परवाने रद्द करण्यात आले.
गुटखा आणि पान मसाल्याविरोधात 1,304 गुन्हे
प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची विक्री, वाहतूक व वितरण करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने विशेष कारवाई केली. या प्रकरणांत 1,304 गुन्हे दाखल करून 1,629 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत 41.94 कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. तसेच 17 कोटी रुपये किमतीची 207 वाहनेही जप्त करण्यात आली.
दूध, तेल आणि मसाल्यांवरही कारवाई
खाद्यतेलाच्या 1,567 नमुन्यांच्या तपासणीदरम्यान 27.60 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. मसाल्यांच्या 1,764 नमुन्यांच्या तपासणीत 22.34 कोटी रुपये किमतीचा माल जप्त झाला. दुधाचे 5,114 नमुने तपासण्यात आले असून, या कारवाईत 13.37 कोटी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
याशिवाय आंबे, लाडू, खवा, बेकरी उत्पादने, गूळ, तूप आणि आईस्क्रीम यांसारख्या खाद्यपदार्थांवरही धाडी टाकण्यात आल्या. यात 47.39 कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
अन्नपदार्थांच्या नमुन्यांच्या तपासणीत काय आढळले?
अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलम 47 अन्वये एकूण 18,215 अंमलबजावणी नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी 6,833 नमुने प्रमाणित आढळले. तर 567 नमुने कमी दर्जाचे, 243 नमुने चुकीच्या नाममुद्रेचे आणि 398 नमुने असुरक्षित असल्याचे तपासणीत समोर आले. या प्रकरणांमध्ये 184 परवाने निलंबित करण्यात आले आहेत.