मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी अभिषेक पंडित याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केले आहे. अभिषेक हा या संपूर्ण प्रकरणातील कथित सूत्रधार अनिल पंडित याचा भाऊ असल्याचे समोर आले असून, या टोळीतील इतर आरोपींना आर्थिक मदत करण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा संशय आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी हरियाणामधील कर्नाल येथे धडकले असतानाच, तो पोलिसांच्या हाती न लागता पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, या कारवाईत पोलिसांनी त्याची पत्नी सुनेहा पंडित हिला अटक केली आहे.
आर्थिक जाळे आणि परदेशात पलायनाची भीती
https://www.prahaar.in/2026/11/20/no-action-against-encroachments-in-prabhadevi-without-rehabilitation-demolition-work-stayed-following-intervention-by-dcm-eknath-shinde/
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारी टोळीचे आर्थिक व्यवहार सांभाळण्याची मोठी जबाबदारी अभिषेक पंडितकडे होती. पोलीस कारवाईच्या धास्तीने तो देश सोडून पसार होण्याची दाट शक्यता आहे. जर तो अशा एखाद्या देशात निघून गेला, जिथून प्रत्यार्पणाची प्रक्रिया अवघड आहे, तर तपासात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच अभिषेकने कोणत्याही विमानतळावरून परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तिथेच रोखता यावे, यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, फरार अभिषेकचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/20/uttar-pradesh-cm-yogi-adityanaths-mother-savitri-devi-dies-at-91-in-uttarakhand/
पत्नी सुनेहा पंडितची भूमिका आणि अटक
गुन्हे शाखेच्या पथकाला आधीच असा अंदाज होता की कर्नालमध्ये छापा पडल्यानंतर अभिषेक पळून जाऊ शकतो. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेकची पत्नी सुनेहा पंडित हिला अटक केली असून, ती पतीच्या बँक खात्यांचे कामकाज पाहत असल्याचे तपासात पुढे आले आहे. अभिषेकच्या सांगण्यावरून ती विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करत होती, असा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे.
क्रिप्टोकरन्सी वॉलेट आणि १३ वी अटक
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सुनेहा पंडित ही या गोळीबार प्रकरणातील १३ वी अटक आरोपी ठरली आहे. ती पतीच्या नावावर असलेल्या बँक खात्याद्वारे या गुन्ह्यातील इतर सहआरोपींपर्यंत निधी पोहोचवत होती. तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक धक्कादायक बाब समजली असून, अभिषेक परदेशातून एक क्रिप्टोकरन्सी वॉलेट हाताळत होता आणि खंडणीतून मिळालेली रक्कम या वॉलेटमध्ये जमा केली जात होती. सध्या मुंबई पोलीस अभिषेकचे सर्व आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि या टोळीशी असलेले त्याचे संबंध यांचा सखोल तपास करत आहेत.