Home टेक्नॉलॉजी Instagram story edit feature : इंस्टा दादा कमाल केलंस…! आता स्टोरी चुकली तरी टेन्शन नाही; डिलीट न करता आता थेट करा एडीट अन् बरंच काही

Instagram story edit feature : इंस्टा दादा कमाल केलंस…! आता स्टोरी चुकली तरी टेन्शन नाही; डिलीट न करता आता थेट करा एडीट अन् बरंच काही

0
Instagram story edit feature : इंस्टा दादा कमाल केलंस…! आता स्टोरी चुकली तरी टेन्शन नाही; डिलीट न करता आता थेट करा एडीट अन् बरंच काही

सध्या सोशल मीडियाच्या जगात तरुणाईमध्ये सर्वाधिक क्रेझ असलेल्या इंस्टाग्रामने आपल्या वापरकर्त्यांची एक जुनी आणि मोठी अडचण सोडवणारे फीचर सादर केले आहे. अनेकदा आपण घाईघाईत किंवा उत्साहाच्या भरात स्टोरी पोस्ट करतो आणि त्यानंतर लक्षात येते की शब्दाची चूक झाली आहे, चुकीचे गाणे लागले आहे किंवा स्टिकर नीट बसलेले नाही. अशा वेळी संपूर्ण स्टोरी डिलीट करून पुन्हा नव्याने बनवणे कंटाळवाणे ठरते. आता या त्रासातून सुटका मिळणार असून, स्टोरी अपलोड केल्यानंतरही त्यात बदल करता येणार आहेत. सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, स्टोरी एडीट केल्यानंतरही त्यावरील व्ह्युज, लाईक्स किंवा आलेले रिप्लाय गायब होणार नाहीत; ते जसेच्या तसे राहतील.

नव्या फीचरची कार्यपद्धती नेमकी कशी असेल ?

https://www.prahaar.in/2026/11/20/no-action-against-encroachments-in-prabhadevi-without-rehabilitation-demolition-work-stayed-following-intervention-by-dcm-eknath-shinde/

इंस्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनी या अपडेटबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, स्टोरी पब्लिश झाल्यानंतर वापरकर्त्यांना त्यातील मजकूर (टेक्स्ट), गाणे (म्यूजिक), स्टिकर्स आणि हाताने काढलेल्या खुणा किंवा चित्र (ड्रॉइंग) यांमध्ये सुधारणा करता येईल. मात्र, यासाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे. स्टोरी पोस्ट केल्यानंतर केवळ सुरुवातीच्या १५ मिनिटांच्या आतच हा एडीट पर्याय सक्रिय राहील. या कालावधीनंतर त्यात बदल करण्याचा पर्याय बंद होईल. त्यामुळे ज्यांना स्टोरी टाकल्यानंतर लगेच एखादी चूक लक्षात येते, त्यांच्यासाठी हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

अपलोड केलेली स्टोरी एडीट करण्याची सोपी पद्धत

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्टोरी पोस्ट केल्यानंतर १५ मिनिटांच्या आत प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम आपल्या फोनवरील इंस्टाग्राम अ‍ॅप उघडा आणि तुम्ही नुकतीच टाकलेली स्टोरी ओपन करा. स्टोरीच्या खालील कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन टिंबांवर (थ्री डॉट मेन्यू) क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे ‘एडीट’ (Edit) हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यावर तुम्ही स्टोरीतील टेक्स्ट, म्यूजिक, स्टिकर्स किंवा ड्रॉइंगमध्ये हवे ते बदल करू शकता.

स्टोरी अधिक आकर्षक बनवणारे इतर नवे बदल

केवळ एडीट पर्यायापुरतेच हे अपडेट मर्यादित नसून, इंस्टाग्राम स्टोरीचा अनुभव अधिक रंगतदार करण्यासाठी कंपनीने इतरही काही नवे पर्याय जोडले आहेत. स्टिकर्स अधिक आकर्षक दिसावेत म्हणून त्यामध्ये नवे फॉन्ट, वेगवेगळे रंग आणि विविध आकार समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच, स्टिकर्ससाठी स्वतंत्र शीट्स उपलब्ध करून दिल्या जात असल्याने हवे ते स्टिकर शोधणे अधिक सोपे होईल. याशिवाय, फोटो निवडण्याची पद्धत अधिक सोपी केली जात असून, नवीन ब्लर इफेक्ट, विविध रंग आणि ग्रेडिएंट बॅकग्राउंड्समुळे स्टोरी तयार करणे अधिक सर्जनशील आणि रंजक होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here