Home नाशिक कुंभमेळा Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी मोठी तयारी ! गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी मोठी तयारी ! गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर

0
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी मोठी तयारी ! गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्यात लाखो भाविक दाखल होणार असल्याने गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आता अत्याधुनिक ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीचे डिजिटल स्वरूपात विश्लेषण करून संभाव्य धोके आधीच ओळखणे शक्य होणार आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २४ नोव्हेंबर रोजी आंतरविभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता जुन्या जिल्हा परिषद भवनातील आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे. या डिजिटल ट्विन प्रणालीचे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरशी (ICCC) एकत्रीकरण केले जाणार आहे. जीआयएस आधारित एकाच व्यासपीठावर पोलीस, महापालिका, वाहतूक, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यांसह विविध विभागांची माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना तातडीने निर्णय घेता येणार आहेत.

गर्दीचा अंदाज आधीच कळणार

कुंभमेळ्यादरम्यान कोणत्या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढू शकते, गर्दीची घनता किती असेल आणि भाविकांची हालचाल कोणत्या दिशेने होईल, याचा अंदाज डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेता येणार आहे. संभाव्य गर्दीच्या कोंडीची ठिकाणे आणि सुरक्षेचे धोके आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, अतिवृष्टी किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास घाट परिसरात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचेही आकलन करता येणार आहे. त्यानुसार भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे नियोजन आधीच करता येईल.

याशिवाय एखाद्या ठिकाणी गर्दी वाढल्यास त्याचा परिणाम पार्किंग, होल्डिंग एरिया, शटल सेवा आणि वाहतूक व्यवस्थेवर कसा होईल, याचेही विश्लेषण या प्रणालीद्वारे केले जाणार आहे. संभाव्य संकटाची आगाऊ सूचना मिळाल्याने पोलीस, अग्निशमन, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री वेळेत तैनात करता येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.

https://www.prahaar.in/2026/11/20/nashik-crime-suspicion-of-character-constant-harassment-and-finally-a-horrific-end-a-wife-is-murdered-in-nashik-due-to-her-husbands-suspicions-about-her-character/

अनेक विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार

या महत्त्वपूर्ण बैठकीला पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), एसटी महामंडळाचे अधिकारी, आरोग्य, जलसंपदा, स्मार्ट सिटी, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्येक विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

दहा कंपन्यांकडून संकल्पना आराखडे मागवणार

डिजिटल ट्विन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाने इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागवली आहे. तांत्रिक सादरीकरणानंतर निवडण्यात येणाऱ्या दहा कंपन्यांना सीसीटीव्ही फुटेज, जीआयएस नकाशे, वाहतूक आराखडे आणि मागील पुरासंबंधीची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधित कंपन्यांना प्रूफ ऑफ कन्सेप्ट (POC) तयार करावा लागणार आहे.

या सादरीकरणातून उत्कृष्ट पाच कंपन्यांची निवड केली जाईल. त्यानंतर प्रकल्पासाठी अंतिम निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूणच, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी नियंत्रण, भाविकांची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. डिजिटल ट्विन प्रणाली प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here