महाराष्ट्र: मणिपूर राज्यातील इम्फाळ पूर्व परिसरामध्ये देशसेवेचे कार्य करत असताना धुळे तालुक्यातील एका जवानाला वीरमरण आले आहे. भारतीय सैन्य दलातील जवान हे धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपूत्र असून त्याचं नाव जयेश माळी असं आहे. जयेश माळी हे भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट शिपाई म्हणून कार्यरत होते. मणिपूर राज्यातील इम्फाळ पूर्व परिसरामध्ये, 18 नोव्हेंबर रोजी बुधवारी देशसेवेचे कार्य करताना सैन्य दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातामध्ये जयेश यांचा दुर्देवी मृत्यू झाला. जयेश यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी रामी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट शेअर करत, जयेश यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/pavana-dam-alternative-land-equal-to-the-acquired-area-to-be-provided-to-those-affected-by-the-pavana-dam-maximum-limit-of-4-acres/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहताना लिहिले की, “मणिपूरमध्ये गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाचे वाहन तलावात घसरून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलात नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले. भारतमातेच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणार्या या वीर जवानाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती” मणिपूरच्या इम्फाळ पूर्वेतील चालौ परिसरामध्ये जयेश माळी हे सीमेवर गस्तावर होते. 357 फिल्ड हॉस्पिटलच्या युनिटमध्ये नर्सिंग असिस्टंट या पदावर जयेश कार्यरत होते. 18 नोव्हेंबरच्या दिवशी, एका मोहिमेदरम्यान, सैन्य दलातील इतर जवानांसोबत ते लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल या वाहनातून प्रवास करत होते.
मणिपूरमध्ये गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाचे वाहन तलावात घसरून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलात नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले. भारतमातेच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 19, 2026
प्रवास करत असताना लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल रस्त्याच्या शेजारी असलेल्या तलावामध्ये वाहन घसरून पाण्यात बुडाले. अपघातानंतर, स्थानिक नागरिकांनी आणि सैन्य दलाच्या क्विक रिॲक्शन टीमने बचावकार्य सुरू केले. बचावकार्य करत शिपाई जयेश माळी यांना पाण्याबाहेर काढले आणि लगेचच बाबिना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमने जयेश यांनी वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र पाण्यामध्ये बुडाल्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जयेश यांच्या निधनामुळे धुळे जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे. जयेश यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/stay-on-non-essential-construction-in-drought-affected-talukas-of-the-state/