मुंबई : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. राज्य सरकारकडून करण्यात येणारा नामकरणाचा प्रस्ताव दादर रेल्वे स्थानकासाठी नसून दादर मेट्रो स्थानकासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या (डीजीआयपीआर) प्रसिद्धीपत्रकात दादर रेल्वे स्थानकाचा उल्लेख झाल्याने हा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, प्रत्यक्षात दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/puc-test-made-mandatory-every-6-months-for-bs-4-and-bs-6-vehicles-older-than-10-years-change-in-rules/
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. या बैठकीत चैत्यभूमीवरील नियोजन, इंदू मिल येथील स्मारकाचा विषय आणि महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमांसह दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दाही चर्चेला आला. आगामी विधिमंडळ अधिवेशनात नामकरणाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
महाराष्ट्रातील मेट्रो स्थानकांच्या नामकरणाबाबत राज्य सरकारने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समितीचे अध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहअध्यक्ष आहेत. या समितीच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारशी करण्यात येणार आहेत. मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक असल्याची माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, डीजीआयपीआरकडून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दादर रेल्वे स्थानकाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचेच नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडियावरही यासंदर्भात विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, नामकरणाचा प्रस्ताव मेट्रो स्थानकापुरताच मर्यादित असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे.
या नामकरण प्रक्रियेसाठी विधिमंडळाच्या समितीबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दादर मेट्रो स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ असे नामकरण करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे सध्याचे नाव कायम राहणार असून, नामकरणाचा निर्णय मेट्रो स्थानकापुरताच असणार आहे.