गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगलात झालेल्या वर्षा तुरकर हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून पत्नीनेच या महिलेच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. ( Gondia Crime News)
https://www.prahaar.in/2026/11/19/woman-attempts-to-enter-motormans-cabin-at-goregaon-railway-station-video-goes-viral/
दिवाळीसाठी माहेरी आलेल्या वर्षा तुरकर यांची हत्या
मृत वर्षा तुरकर (वय 34) या पुण्यातील धानोरी परिसरात राहत होत्या. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी येथील माहेरी आल्या होत्या. 14 नोव्हेंबर 2026 रोजी त्या आपला मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत तिरोडा येथे गेल्या होत्या.
तेथून परतत असताना बोंडराणी येथील शिवमंदिराजवळील जंगल परिसरात सायंकाळी 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी वर्षा यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 15 नोव्हेंबर रोजी दवनीवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
200 CCTV कॅमेऱ्यांची तपासणी
हत्येचा तपास करताना पोलिसांनी तिरोडा ते खैरलांजी, खैरलांजी ते वाराशिवनी, वाराशिवनी ते बालाघाट आणि बालाघाट ते गोंदिया या मार्गावरील सुमारे 200 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये काही संशयित मोटारसायकलवरून नितेश अग्रवाल यांच्या कारचा पाठलाग करताना दिसून आले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर गोंदिया येथून इमरान करीम शेख (वय 26) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीतून हत्येच्या कटाची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
13 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप
पोलीस तपासानुसार, नितेश अग्रवाल आणि वर्षा तुरकर यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे नितेशची पत्नी मोना अग्रवाल नाराज होती. याच कारणातून तिने कुणाल कुंभळकर याच्या मदतीने शाहरुख खान पठाण याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्षा यांच्या हत्येसाठी 13 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे.
चार आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरू
या प्रकरणात इमरान करीम शेख, शाहरुख खान फिरोज खान पठाण, कुणाल श्यामलाल कुंभळकर आणि मोना नितेश अग्रवाल या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर नलिन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिशा राऊत या अन्य दोन संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या हत्येमागील कारण आणि कटातील प्रत्येक आरोपीची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.