मुंबई: दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलाव पुन्हा एकदा भक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. ‘मिनी वाराणसी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी बाणगंगा तलावावर मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून देव दिवाळी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने भव्यदिव्य ‘बाणगंगा महाआरती’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्वांत प्राचीन आणि महत्त्वाच्या वारसास्थळांपैकी एक असलेल्या या ठिकाणी सायंकाळच्या आरतीसाठी आणि धार्मिक विधींसाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/brihanmumbai-municipal-corporation-takes-action-against-mumbai-based-don-dawood-ibrahims-house-heavy-police-deployment-during-the-operation/
बाणगंगा तलाव हा एक ऐतिहासिक गोड्या पाण्याचा कुंड असून तो वाळकेश्वर मंदिर संकुलात वसलेला आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ असूनही या कुंडात भूमिगत झऱ्यातून गोड पाणी येते, ही या ठिकाणची सर्वांत मोठी खासियत आहे. येथे भगवान शिवाला समर्पित असलेले वाळकेश्वर मंदिर भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय परिसरात परशुराम ऋषींचे मंदिर आणि धर्मशाळाही आहे. अनेक भाविक येथे दैवते आणि पूर्वजांसाठी धार्मिक विधी करतात आणि मंदिरांमध्ये प्रसाद अर्पण करतात. प्राचीन मंदिरे, पारंपरिक वास्तुकला आणि जुन्या काळातील प्रसन्न वातावरण यामुळे हे ठिकाण आजही महत्त्वाचे तीर्थक्षेत्र राहिले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/several-artists-including-ayushmann-khurrana-who-have-either-received-threats-or-been-subjected-to-attacks-are-likely-to-be-provided-with-x-category-security/
बाणगंगा तलावाच्या नावामागे प्रभू रामचंद्रांशी निगडित रंजक आख्यायिका आहे. वनवासात असताना माता सीतेचा शोध घेत प्रभू राम आणि लक्ष्मण या भागात आले होते, असा विश्वास आहे. तेव्हा प्रभू रामाने जमिनीवर बाण मारला आणि त्यातून भोगवती अर्थात भूमिगत गंगेचा झरा प्रकट झाला. बाणाने निर्माण झालेल्या या जलस्त्रोतामुळे याला ‘बाणगंगा’ असे नाव पडले. पुढे या परिसरात मंदिरे आणि धर्मशाळांची गर्दी वाढत गेली आणि अरुंद गल्लीच्या कडेने वसलेले हे कुंड धार्मिक स्थळ बनले. वाराणसीप्रमाणेच पायऱ्या असलेला पवित्र जलकुंड, भोवतालची प्राचीन मंदिरे, घाट आणि हिंदू धार्मिक परंपरांशी घट्ट नाते यामुळे बाणगंगा तलावाला ‘मिनी वाराणसी’ म्हटले जाते. इतिहासाच्या दृष्टीने पाहिल्यास, हा कुंड 1127 मध्ये शिलाहार राजघराण्यातील मंत्री लक्ष्मण प्रभू यांनी बांधल्याचे मानले जाते आणि 1715 मध्ये स्थानिक देणग्यांच्या मदतीने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली.
https://www.prahaar.in/2026/11/19/pedestrians-first-650-metre-long-footpath-on-mahatma-gandhi-road-in-vile-parle-becomes-obstruction-free/
मलबार हिलवरील तीन बत्ती भागातून बाणगंगा तलावाकडे जाता येते. मुंबई लोकलने जायचे झाल्यास पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड आणि ग्रँट रोड ही जवळची स्थानके आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस रोड आणि वाळकेश्वर रोडमार्गे वाहनाने अथवा लोकल किंवा मेट्रोने ग्रँट रोड किंवा चर्नी रोडला उतरून बस, टॅक्सी किंवा चालत येथे सहज पोहोचता येते. देव दिवाळीच्या संध्याकाळी या ऐतिहासिक कुंडातील महाआरतीचा अनुभव घेणे भाविकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.