Home महाराष्ट्र अहिल्यानगर भाड्याच्या मालमत्तेवर मालकीचा दावा? उबाठाचे किरण काळे यांच्यावर गंभीर आरोप; 70 लाखांची मालमत्ता 33 लाखांत घेण्याचा प्रयत्न?

भाड्याच्या मालमत्तेवर मालकीचा दावा? उबाठाचे किरण काळे यांच्यावर गंभीर आरोप; 70 लाखांची मालमत्ता 33 लाखांत घेण्याचा प्रयत्न?

0
भाड्याच्या मालमत्तेवर मालकीचा दावा? उबाठाचे किरण काळे यांच्यावर गंभीर आरोप; 70 लाखांची मालमत्ता 33 लाखांत घेण्याचा प्रयत्न?
भाड्याच्या मालमत्तेवर मालकीचा दावा? उबाठाचे किरण काळे यांच्यावर गंभीर आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील सावेडी परिसरातील वैभव कॉलनी येथील मालमत्तेच्या ताब्यावरून मालमत्ताधारक आणि भाडेकरू यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. राहण्यासाठी भाड्याने दिलेल्या मालमत्तेवर आता खरेदी-विक्रीचा दावा करण्यात येत असल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. तब्बल 65 ते 70 लाख रुपये बाजारमूल्य असलेली मालमत्ता केवळ 33 लाख रुपयांत मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप मालमत्ताधारक संजय भंडारी आणि सुरेखा भंडारी यांनी शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर केला आहे. या प्रकरणी न्यायालयीन लढा सुरू असतानाच मालमत्तेचा ताबा परत मिळावा, थकीत भाडे वसूल व्हावे आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, या मागणीसाठी भंडारी दाम्पत्याने अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलकर्णे यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.

भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2018 मध्ये वैभव कॉलनी, सावेडी येथील तळमजल्यावरील सुमारे 750 चौरस फुटांची जागा किरण गुलाबराव काळे यांना दरमहा 6,000 रुपये भाड्याने राहण्यासाठी देण्यात आली होती. त्यावेळी भाडेकरार करण्याबाबत विचारणा केली असता, आधारकार्ड आणि पॅनकार्ड हरवले असून ऑक्टोबर 2019 मधील निवडणुकीनंतर आवश्यक कागदपत्रे देऊन करार करू, असे आश्वासन दिल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, 21 ऑक्टोबर 2018 रोजी भंडारी यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली. पुढे कोरोना महामारीमुळे भाडेकराराचा विषय लांबणीवर पडला. कोरोना काळानंतर करार करण्याची मागणी केली असता, सामाजिक संस्थेचे (एनजीओ) काम करत असल्याने भाडेकरार झाल्यास ऑडिटमध्ये भाड्याची रक्कम दाखवावी लागेल, असे कारण काळे यांनी दिल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे. सहा-सहा महिन्यांनी भाडे देण्याचेही सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

काळे यांनी सुरुवातीला कुटुंबासह राहण्यासाठी जागा मागितली होती. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचा आणि लहान मुलांचा विचार करून माणुसकीच्या भावनेतून त्यांना जागा देण्यात आली. मात्र, भाडे नियमित मिळत नव्हते. अनेकदा आठ ते नऊ महिन्यांनंतर भाडे दिले जात होते. वारंवार मागणी केल्यानंतरच भाड्याची रक्कम मिळत असल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे.

दरम्यानच्या काळात संबंधित जागेत काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर काळे यांनी उबाठा गटाचे कामही याच जागेतून सुरू केले. त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये भंडारी यांनी जागा खाली करण्यास सांगितले. त्यावेळी मुलांचे वय आणि कौटुंबिक परिस्थितीचे कारण देत आणखी 11 महिन्यांची मुदत मागण्यात आली. भंडारी यांनी मुदत देण्यास सहमती दर्शविली; मात्र नोंदणीकृत भाडेकरार करण्याची अट घातली.

त्यानुसार 28 एप्रिल 2025 रोजी नोंदणीकृत भाडेकरार करण्यात आला. त्यामध्ये 10,000 रुपये अनामत रक्कम आणि दरमहा 8,000 रुपये भाडे निश्चित करण्यात आले. मात्र, करारानंतरही भाडे नियमित मिळाले नसल्याचे भंडारी यांनी सांगितले. एप्रिल ते ऑगस्ट 2025 या पाच महिन्यांचे भाडे डिसेंबर 2025 मध्ये ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर 2025 पासून भाडे थकीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/17/show-the-film-to-scholars-of-the-saint-tradition-before-the-second-part-of-the-ramayana-is-released-demand-by-hindu-organizations/

नोटीस व मुदतवाढ देऊनही ताबा मिळेना!

भंडारी कुटुंबाने संबंधित मालमत्ता विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी वरच्या मजल्यावरील जागाही रिकामी करून घेण्यात आली होती. नोंदणीकृत भाडेकरारातील अटींनुसार 11 जानेवारी 2026 रोजी काळे यांना एक महिन्याची नोटीस देऊन जागा खाली करण्यास सांगण्यात आले. तसेच सप्टेंबर 2025 ते जानेवारी 2026 या पाच महिन्यांचे थकीत भाडे देण्याची मागणी करण्यात आली. काळे यांनी करारातील अटींचे पालन करण्यास बांधील असल्याचे मान्य केले; मात्र अल्पावधीत स्थलांतर करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर भंडारी यांनी 10 फेब्रुवारी 2026 रोजी आणखी 1 महिना 15 दिवसांची मुदतवाढ दिली. तरीही जागेचा ताबा आणि चाव्या परत मिळाल्या नसल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे.

33 लाखांत मालमत्ता खरेदीचा दावा!

या प्रकरणाला 5 मे 2026 रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान वेगळे वळण मिळाल्याचे भंडारी यांनी सांगितले. काळे यांनी न्यायालयात 2023 मध्ये संबंधित मालमत्ता खरेदी करण्याबाबत तोंडी व्यवहार ठरला होता, असा दावा केला. या व्यवहारात मालमत्तेची एकूण किंमत 41 लाख रुपये निश्चित झाली होती. त्यापैकी 8 लाख रुपये वेळोवेळी रोख दिल्याचेही न्यायालयात सांगण्यात आल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे. उर्वरित 33 लाख रुपये देऊन मालमत्तेची खरेदी पूर्ण करून देण्याची विनंती करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मात्र, काळे यांच्याकडून आपण 8 लाख रुपये कधीही स्वीकारलेले नाहीत. तसेच 2023 मध्ये मालमत्तेच्या विक्रीचा कोणताही तोंडी अथवा लेखी करार झालेला नाही, असे संजय भंडारी यांनी स्पष्ट केले आहे. सुरुवातीपासून काळे हे केवळ भाडेकरू म्हणूनच जागेत राहत होते. आता खरेदीचा दावा करून बाजारमूल्याच्या तुलनेत कमी किमतीत मालमत्ता मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here