नाशिक : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जात आहे. AI Deepfake च्या माध्यमातून चक्क मुलीचा चेहरा आणि आवाज हुबेहूब तयार करून आईकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. ‘क्लासची फी भरायची आहे, तातडीने पैसे पाठव’, अशी विनंती व्हिडिओ कॉलद्वारे करण्यात आली. मात्र, मुलगी त्याचवेळी घरात असल्याने आईला संशय आला आणि सायबर भामट्यांचा डाव फसला. या प्रकारामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुलीचा हुबेहूब चेहरा अन् आवाज पाहून आईही चक्रावली
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका शासकीय रुग्णालयात महिला कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची मुलगी जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे मुलगी सध्या घरी आली होती. याचदरम्यान महिलेच्या मोबाईलवर मुलीच्या चेहऱ्याचा आणि आवाजाचा वापर केलेला व्हिडिओ कॉल आला. कॉलवरील व्यक्तीने मुलीप्रमाणेच बोलत ‘क्लासची फी भरायची आहे, तातडीने पैसे पाठव’, अशी मागणी केली. मात्र, मुलगी प्रत्यक्ष घरातच असल्याने आईला हा प्रकार संशयास्पद वाटला. तिने कॉल करणाऱ्या व्यक्तीकडे अधिक चौकशी करण्यास सुरुवात करताच कॉल अचानक कट झाला. त्यामुळे संभाव्य आर्थिक फसवणूक टळली.
https://www.prahaar.in/2026/11/17/heartbreaking-incident-in-jalgaon-mother-dies-from-electric-shock-after-rushing-to-save-her-son/
AI Deepfake च्या माध्यमातून कशी केली जाते फसवणूक ?
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्यक्तींचे फोटो, व्हिडिओ आणि आवाजाचे नमुने मिळवतात. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साधनांचा वापर करून आवाजाची हुबेहूब नक्कल म्हणजेच व्हॉइस क्लोनिंग केले जाते. तसेच फेस स्वॅप तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधित व्यक्तीचा चेहराही व्हिडिओमध्ये दाखवता येतो. यामुळे व्हिडिओ कॉलवर समोर दिसणारी व्यक्ती खरी असल्याचा भास निर्माण होतो. विशेष म्हणजे, जवळच्या नातेवाइकांच्या नावाने तातडीने पैशांची मागणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Deepfake कॉल ओळखायचा कसा ? अशी घ्या काळजी
– व्हिडिओ कॉलमध्ये चेहऱ्याच्या हालचाली आणि आवाज यांच्यात विसंगती जाणवते का, याकडे लक्ष द्या.
– ओठांची हालचाल, डोळ्यांची हालचाल आणि चेहऱ्यावरील हावभाव अप्राकृतिक वाटत असल्यास सावध व्हा.
– पैसे मागितल्यास घाईघाईने व्यवहार करू नका.
– कुटुंबातील सदस्यांसाठी एक खास सांकेतिक शब्द निश्चित करा.
– संशयास्पद कॉल आल्यास तो कट करून संबंधित व्यक्तीच्या मूळ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.
– सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो, व्हिडिओ आणि माहिती सार्वजनिक करण्याबाबत काळजी घ्या.
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
AI Deepfake च्या माध्यमातून होणारी फसवणूक हा सायबर गुन्ह्यांचा नवा प्रकार आहे. अशा संशयास्पद कॉलला प्रतिसाद देऊ नका. कोणत्याही व्यक्तीने व्हिडिओ कॉलवर पैसे मागितल्यास आधी तिची खातरजमा करा. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी केले आहे.