Home ताज्या घडामोडी Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली

Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली

0
Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज येथे येऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करतात, असे त्यांनी यावेळी सांगितले. स्वर्गीय बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसेना आजही तितक्याच ताकदीने पुढे नेत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात चांगले काम करत असून, समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. बाळासाहेबांची शिकवण नेहमीच ही होती की, कार्यकर्ता घरात नाही तर दारात शोभून दिसतो. याच विचारानुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी, दुःख आणि वेदना समजून घेत आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे काम सुरू आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

पुढे बोलताना, ‘जिथे संकट, तिथे शिवसेना आणि जिथे आपत्ती, तिथे शिवसेना’ ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आम्ही प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेत आहोत. राज्यातील ज्या ज्या भागांत दुष्काळी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना आणि मंत्र्यांना दिल्या आहेत, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/11/17/ncp-maharashtra-major-decision-by-ncp-mlas-for-drought-affected-farmers-they-will-donate-one-months-salary/

तसेच, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द आम्ही दिला होता आणि तो पाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असा पुनोरोच्चार करत त्यांनी आठवण करून दिली. सरकारच्या वतीने तातडीची पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, शिवसेनेच्या माध्यमातूनही दिवाळी मदत देण्यात आली आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठीशी मदतीचा हात कायम राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

याशिवाय, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १२ प्रकारच्या सवलती आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळणारच आहे. त्यामुळे विरोधकांनी अग्रिम मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये. ही राजकारण करण्याची वेळ नसून शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here