PM Suraksha Bima Yojana : देशातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात अपघात विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. या योजनेत वार्षिक केवळ 20 रुपये प्रीमियम भरून अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत मिळू शकते.
https://www.prahaar.in/2026/11/17/two-horrific-accidents-in-uttarakhand-12-dead-and-24-injured-after-a-bolero-and-a-bus-plunge-into-a-gorge/
योजनेसाठी पात्रता काय?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतात.
- अर्जदाराचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असावे.
- खात्यातून विम्याचा वार्षिक हप्ता ऑटो-डेबिट करण्यास संमती द्यावी.
- एका पात्र बचत खात्याच्या माध्यमातून योजनेत सहभागी होता येते.
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असल्याची माहिती अर्ज करण्यापूर्वी संबंधित बँकेतून तपासून घ्यावी.
अपघात झाल्यास किती विमा संरक्षण मिळते?
या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. तसेच अपघातामुळे पूर्ण आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यासही 2 लाख रुपये मिळू शकतात.
अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, उदाहरणार्थ एका डोळ्याची दृष्टी जाणे किंवा एका हाताचा अथवा पायाचा वापर कायमस्वरूपी गमावणे, अशा परिस्थितीत 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. विम्याचा लाभ योजनेतील निर्धारित अटी आणि अपंगत्वाच्या निकषांनुसार मिळतो.
वर्षाला फक्त 20 रुपये प्रीमियम
या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 20 रुपये आहे. ही रक्कम दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यातून ऑटो-डेबिट पद्धतीने वजा केली जाते. योजनेचा विमा कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा असतो. त्यामुळे खात्यात पुरेशी रक्कम ठेवणे आवश्यक आहे.
कमी वार्षिक खर्चात अपघातामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक संकटापासून संरक्षण मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून योजनेची नोंदणी, नूतनीकरण आणि विम्याच्या अटींबाबत माहिती घ्यावी.