Maharashtra Weather News: महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लपंडाव सुरू आहे. पहाटे आणि सकाळी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा जाणवत आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम आहे. उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात तापमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या ‘अकबन’ चक्रीवादळामुळे 19 नोव्हेंबरच्या आसपास विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज नसला, तरी चक्रीवादळाच्या दिशेनुसार हवामानात बदल होऊ शकतो.
https://www.prahaar.in/2026/11/15/india-czech-republic-defence-ties-get-new-strength-army-chief-general-dhiraj-seth-on-4-day-visit/
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढला
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या माहितीनुसार, उत्तरेकडील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या भागात पुन्हा चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही ठिकाणी बर्फवृष्टी आणि पाऊस पडू शकतो. उत्तरेकडून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने राज्यात पहाटे आणि सकाळी थंडी जाणवत आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात तापमानात घट होऊ लागली आहे. काही ठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. मात्र, दुपारच्या वेळी तापमान वाढत असल्याने उकाडा कायम आहे. त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यातून ‘अकबन’ चक्रीवादळ विकसित होत असल्याची माहिती आहे. या चक्रीवादळाच्या हालचालींमुळे 19 नोव्हेंबरच्या आसपास विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, चक्रीवादळाची दिशा बदलल्यास पावसाचा अंदाजही बदलू शकतो.
दरम्यान, अरबी समुद्रातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळाची पुढील दिशा आणि त्याचा महाराष्ट्रावरील परिणाम याकडे हवामान अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
यंदा कडाक्याची थंडी पडणार नाही?
महेश पलावत यांच्या अंदाजानुसार, यंदा मागील वर्षासारखी तीव्र थंडी जाणवण्याची शक्यता कमी आहे. एल निनोच्या प्रभावामुळे तापमानावर परिणाम होऊ शकतो. हा प्रभाव मार्च-एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात थंडीची तीव्रता किती राहणार, हे आगामी काळातील हवामानातील बदलांवर अवलंबून असेल.