Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

0
Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू
Photo - Video Grab

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने स्थानक परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे 6:50 वाजता 112 या आपत्कालीन हेल्पलाइनवर फोन आला. 9420112655 या मोबाईल क्रमांकावरून फोन करणाऱ्या व्यक्तीने सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

धमकी मिळताच श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व निकामी पथक (बीडीडीएस) स्थानकावर दाखल झाले. संपूर्ण रेल्वे स्थानक आणि परिसराची तपासणी करण्यात आली. ही शोधमोहीम रात्री सुमारे 9:30 वाजता पूर्ण झाली. मात्र, पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

धमकीचा फोन करणाऱ्याचा शोध सुरू

या धमकीची माहिती रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ नियंत्रण कक्षाला दिली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. संबंधित मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांकडून पुढील माहिती गोळा केली जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

दरम्यान, यापूर्वीही मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना धमकीचे ईमेल मिळाले होते. अभिनेता अमिताभ बच्चन यांचा बंगला, मुंबई महापौरांचे कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी रेसकोर्स, काही बँका आणि न्यायालयांना लक्ष्य करून हे ईमेल पाठवण्यात आले होते. त्यानंतर संबंधित ठिकाणी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली होती. त्या ठिकाणीही कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नव्हती. या धमकीच्या घटनांचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here