ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून येत्या सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 पासून ठाण्यातील अनेक प्रमुख भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, यापुढे दर सोमवारी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
अलनिनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत अत्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आणि संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पूर्वतयारीच्या उपाययोजना म्हणून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याच सूचनांच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वितरित होणाऱ्या पाण्यात 10 टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाणीकपातीचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण (STEM) यांचा संयुक्त शटडाऊन घेण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार, सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 17 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत असा सलग 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. विशेष म्हणजे, हा शटडाऊन केवळ एका सोमवारपुरता मर्यादित नसून, यापुढे प्रत्येक सोमवारी सकाळी 9.00 ते मंगळवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत असा 24 तासांचा नियमित शटडाऊन घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/13/asangaon-kasara-megablock-3-day-mega-block-on-asangaon-kasara-railway-line-check-the-schedule-before-leaving-home/
कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार?
या 24 तासांच्या शटडाऊनमुळे ठाणे शहरातील मोठ्या लोकवस्तीला फटका बसणार आहे. यामध्ये घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन परिसर तसेच मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागांचा समावेश आहे. या सर्व भागांमध्ये सोमवारी दिवसभर आणि रात्रभर नळांना पाणी येणार नाही.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन
सलग 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आणि त्यानंतरही पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, पाणीकपातीच्या या काळात पाण्याचा अपव्यय टाळून अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.