Home क्रीडा Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

0
Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

डकार (सेनेगल) : डकार येथे सुरू असलेल्या चौथ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी दमदार कामगिरीची नोंद केली आहे. स्पर्धेच्या 12व्या दिवशी भारताने 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 9 पदके जिंकत पदकतालिकेत 36वे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत 15 सुवर्णपदकांसह चीन अव्वल स्थानावर असून जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतासाठी सर्वात मोठा ऐतिहासिक क्षण बॉक्सिंग रिंगमध्ये पाहायला मिळाला. पुरुषांच्या 50 किलो वजनी गटात भारताच्या लैरेनलकपम आंबेकर मैतेई याने दमदार कामगिरी करत भारताला युवा ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले बॉक्सिंग सुवर्णपदक जिंकून दिले. याशिवाय, महिलांच्या 48 किलो वजनी गटात गुंजनने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, त्यामुळे भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे.

विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

यापूर्वीच्या स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत आपली छाप पाडली आहे. बॅडमिंटनच्या महिला एकेरीत तन्वी पात्री, ज्युडोमध्ये खुशबू दर्जादा आणि बीच रेसलिंगमध्ये तानिया यांनी रौप्यपदकांची कमाई केली. जलतरणात धिनिधी देसिंघूने 100 मीटर आणि 200 मीटर फ्रीस्टाइल प्रकारांत प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले. तर तीर्थांक पेगूने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक पटकावले. ॲथलेटिक्समध्ये शौर्या आंबुरेने 100 मीटर हर्डल्समध्ये, तर वुशूमध्ये राजकुमारी चानूने कांस्यपदक जिंकून देशाचा गौरव वाढवला.

https://www.prahaar.in/2026/11/12/team-india-to-face-pakistan-in-the-u19-asia-cup-2026-final-defeated-afghanistan-by-8-wickets-in-the-semi-final/

समारोपापूर्वी आणखी पदकांची अपेक्षा

स्पर्धेच्या 12व्या दिवशी बॉक्सिंग, सेलिंग, फुटसल, फेन्सिंग आणि तायक्वांदो या खेळांमध्ये 15 सुवर्णपदकांसाठी लढती सुरू आहेत. उद्या, 13 नोव्हेंबर रोजी या भव्य क्रीडा सोहळ्याचा समारोप होणार आहे. त्यामुळे भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. केवळ 17 खेळाडूंच्या छोट्या ताफ्यासह स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताने मिळवलेले हे यश देशाच्या युवा क्रीडा प्रतिभेची ताकद दाखवणारे ठरले आहे. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीमुळे देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याबाबत आशा अधिक बळावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here