Thane Railway Station: मध्य रेल्वेचे ठाणे हे प्रमुख आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. ठाण्यावरून पनवेल, सीएसएमटी, कर्जत, कसारा, बदलापूर या सारख्या स्थानकावर पोहचण्यासाठी लोकल उपलब्ध असल्याने प्रवाश्यांची गर्दी ही कायमच असते. या वाढत्या गर्दीचा विचार करता ठाणे स्थानकात प्रवाशांच्या सोयीने काही बदल करण्यात आले आहेत. त्यातीलच ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 आणि 6 हे सर्वात व्यस्त विभागांपैकी आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी डोंबिवली, कल्याण, कसारा, आसनगाव, बदलापूर आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांसोबतच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचीही येथे मोठी वर्दळ असते. येणारे प्रवासी आणि लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारे प्रवासी एकाच वेळी एकत्र येत असल्यामुळे, फलाटावर, विशेषतः जिन्या आणि पादचारी पुलांजवळ, ये-जा करताना अनेकदा मोठी वाहतूक कोंडी होते.
https://www.prahaar.in/2026/11/12/gold-rate-an-opportunity-to-buy-gold-or-should-you-wait-for-further-price-hikes-a-major-turnaround-is-possible-in-december/
याचाच विचार करून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 वर नवीन सरकता जिना उभारण्यात आला आहे. तसेच फलाट क्रमांक 2 वर नि: शुल्क स्वच्छतागृह प्रवाश्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. नि:शुल्क स्वच्छतागृह हे डी मार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. सीएसटीच्या दिशेने पहिल्याच पादचारी पुलावर नवीन सरकता जिना उभारण्यात आलेला आहे. तर या नवीन जिन्याची मागणी ही प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. त्याचअनुषंगाने खासदार नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाकडे सरकत्या जिन्याची मागणी केली आणि प्रशासनाकडून ही मागणी देखील पूर्ण करण्यात आली. दरम्यान, 15 डब्यांच्या गाड्यांमधून किंवा कल्याण, कर्जत आणि कसारा दिशेकडून येणाऱ्या गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांसाठी एस्केलेटरची जागा सोयीची ठरत आहे.
यात एक आणखी महत्वाची बाब म्हणजे, नवे नि:शुल्क स्वच्छतागृह हे 24 तास स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येत असून पाणी , वीज, देखभालीची जबाबदारी ही मध्य रेल्वे प्रशासनाकडे असणार आहे. हा स्वच्छतागृहाचा राबवलेला उपक्रम डी मार्ट आणि मध्य रेल्वे यांनी संयुक्तरित्या मिळून केलेला आहे. डी मार्ट हे ठाणे रेल्वे स्थानकावर सर्व फलाटांवर स्वच्छतेची मोहीम राबवणार आहे.