मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरीवली ते नायगाव लोकल प्रवासात एका महिलेने विनयभंगाला विरोध केल्यामुळे संतापलेल्या एका नराधमाने तिला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिल्याची अत्यंत क्रूर आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या भीषण अपघातात पीडित महिलेला तिचा एक हात गमवावा लागला असून, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने १६ टाके पडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५३ वर्षीय जितेंद्र हिरमुखे या आरोपीला अटक केली असून, गुन्हा केल्यानंतर तो अत्यंत निवांतपणे रेल्वे फलाटावरून चालत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आरोपीचा निर्ढावलेपणा
https://www.prahaar.in/2026/11/12/in-a-world-full-of-kattappas-india-is-your-trusted-companion-piyush-goyal-makes-a-major-appeal-to-global-investors-to-invest-in-india/
या घटनेनंतर रेल्वे फलाटावरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये आरोपी जितेंद्र हिरमुखे अत्यंत निर्धास्तपणे चालताना दिसत आहे. लाल रंगाचा शर्ट घातलेला हा आरोपी फलाटावरील गर्दीतून सहज वाट काढत जात असल्याचे आणि अगदी थोड्या वेळासाठी एका सहप्रवाशाशी संवाद साधतानाही दिसत आहे. त्यानंतर तो डावीकडे वळून काही वेळ कॅमेऱ्याच्या दृष्टीक्षेपातून बाहेर जातो आणि नंतर पुन्हा संपूर्ण फलाटावर फेऱ्या मारताना दिसतो. फुटेजच्या शेवटी मात्र तो थोडा बावरलेला दिसतो, हाताने आपले कपाळ चोळतो आणि तिथून पसार होतो. त्याच्या या कृत्यातून त्याच्या मनात कोणतीही भीती किंवा पश्चात्ताप नसल्याचे स्पष्ट होते.
विनयभंगाचा निषेध केल्याने वाढला वाद
पीडित महिला बोरीवलीवरून विरारच्या दिशेने लोकल ट्रेनने प्रवास करत होती. ती नाईगाव स्थानकाच्या जवळ जात असताना, डब्यात उपस्थित असलेल्या एका नराधमाने तिच्याशी वारंवार अयोग्य वर्तन (बॅड टच / विनयभंग) केले. यावर तीव्र संताप व्यक्त करत महिलेने त्याला खडसावले आणि जाब विचारला. ट्रेनमधून खाली उतरण्याच्या वाटेवर असतानाही त्या व्यक्तीचे विकृत वर्तन सुरूच राहिले. तिने त्याला, “तुझ्या घरात आई किंवा बहीण नाही का?” असे म्हणून रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याची विकृती थांबली नाही.
चप्पल मारल्याच्या रागातून धावत्या ट्रेनमधून ढकलले
https://www.prahaar.in/2026/11/12/we-are-not-masters-of-nature-but-a-part-of-it-rss-chief-mohan-bhagwat-statement/
त्या व्यक्तीच्या अतिप्रसंगामुळे आणि गलिच्छ वागण्याने संतापलेल्या महिलेने स्वसंरक्षणासाठी आपली चप्पल त्याच्या दिशेने भिरकावली. यावर आणखी आक्रमक होत आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि आपली चप्पल तिच्यावरफेकली. हा वाद नायगाव स्थानकापर्यंत असाच वाढत गेला. ट्रेन नायगाव स्थानकात थांबत असताना किंवा जवळ असताना, संतापलेल्या आरोपीने त्या महिलेला थेट धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले. ती थेट दोन डब्यांमधील रिकाम्या जागेत (गॅपमध्ये) खाली पडली. ती प्लॅटफॉर्मवर वर येण्याआधीच ट्रेन पुढे निघाल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर एक पोलीस कर्मचारी आणि इतर सहप्रवाशांनी तातडीने तिला धावून मदत करत बाहेर काढले. या दुर्घटनेत दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांना उपचारादरम्यान तिचा एक हात कापावा लागला.
“माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले, मला न्याय हवा!”
रुग्णालयाच्या बेडवर उपचाराधीन असलेल्या आणि अश्रू अनावर झालेल्या पीडितेने आपली कहाणी सांगताना न्याय मागितला. ती म्हणाली, “मी त्याला शिवी दिली, त्याने मला प्रतिउत्तर दिले. मी चपलेने मारून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, तर त्याने माझ्यावर चप्पल उगारली आणि मला ट्रेनमधून खाली ढकलले. मला न्याय हवा आहे. माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या कुटुंबाची सर्व काळजी मी एकटीच घ्यायचे. आता एका हाताने मी काहीच करू शकत नाही. माझ्या डोक्याला १६ टाके पडले आहेत. मला फक्त न्याय हवा आहे, कृपया माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”
पोलिसांची कारवाई आणि कुटुंबीयांचा रोष
या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी जितेंद्र हिरमुखे याला अटक केली आहे. मात्र, दुसरीकडे पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यात ‘खुनाचा प्रयत्न’ (Attempt to Murder) या कलमाचा समावेश केला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. न्याय मिळवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या नेत्यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, वाढता रोष पाहता पोलिसांनी या प्रकरणात योग्य आणि कठोर कलमे लवकरच जोडली जातील, असे आश्वासन दिले आहे.