Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Diwali fire: मुंबईत पाच दिवसांमध्ये एकूण 499 आगीच्या दुर्घटना; फटाक्यांमुळेच लागल्या तब्बल 333 आगी

Mumbai Diwali fire: मुंबईत पाच दिवसांमध्ये एकूण 499 आगीच्या दुर्घटना; फटाक्यांमुळेच लागल्या तब्बल 333 आगी

0
Mumbai Diwali fire: मुंबईत पाच दिवसांमध्ये एकूण 499 आगीच्या दुर्घटना; फटाक्यांमुळेच लागल्या तब्बल 333 आगी
AI Generated Image

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत दीपावलीच्या उत्सवामध्ये मोठयाप्रमाणात आगी लागण्याच्या दुर्घटना घडल्या असून शुक्रवारी ६ नोव्हेंबर ते मंगळवारी १० नोव्हेंबर दरम्यान एकूण ४९९ आगींच्या घटना घडल्या. त्यातील ३३३ घटना अर्थात ६७ टक्के आगीच्या घटना या केवळ आणि केवळ फटाक्यांच्या आतषबाजीमुळे घडल्या आहे. विशेष म्हणजे या सर्व आगीच्या दुर्घटनांमधील मालाड मालवणीत एका मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ०८ जण जखमी झाले आहे. मुंबईत दिवाळीत फटाके वाजवण्यास सार्वजनिक ठिकाणे, गल्ल्या, झोपडपट्टी वस्त्यांमध्ये न्यायालयाने निर्बंध घातलेले असतानाही यंदाच्या दिवाळीत मोठ्याप्रमाणात फटाके फोडले जात आहे.

या फटाक्यांचा आतषबाजीमुळे यंदाच्या दिवाळीत आगीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील ६ ते १० नोव्हेंबर २०२६ दरम्यान अग्निशमन दलाकडे आगीचे एकूण ४९९ कॉल नोंदवले गेले. त्यापैकी ३३३ आगी म्हणजे सुमारे ६७ टक्के फटाक्यांमुळे लागल्या. विभागनिहाय पाहता विभाग परिमंडळ चार अंधेरी ते मालाडमध्ये सर्वाधिक म्हणजे १७५ आगी नोंदवल्या गेल्या. यातील सुमारे १२१ आगी फटाक्यांमुळे होत्या. त्यानंतर परिमंडळ तीनमध्ये (८७), परिमंडळ २,(८१), परिमंडळ पाच (६६) आणि परिमंडळ सहा (६०) अशाप्रकारे परिमंडळांमध्ये आगीच्या एकूण घटना घडल्या, तर कुलाबा ते भायखळा या परिमंडळ एकमध्ये सर्वांत कमी म्हणजे म्हणजे ३० आगीच्या घटनांची नोंद झाली आहे.

रविवारी आणि सोमवारी सर्वांधिक आगी

६ नोव्हेंबरला ३३ आणि ७ नोव्हेंबरला ५६ आगीच्या घटनांचे कॉल आले होते. त्यानंतर रविवारी ८ नोव्हेंबरला ही संख्या थेट १४२ वर पोहोचली, तर सोमवारी ९ नोव्हेंबरला १६६ एवढी होती. म्हणजे पाच दिवसांमधील ही आगीची सर्वांधिक संख्या होती. रविवारी ८ नोव्हेंबरला ज्या १४२ आगीच्या घटना घडल्या त्यापैकी १३७ आगी या फटाक्यांमुळे लागल्या होत्या. तर सोमवारी ९ नोव्हेंबरला १६६ आगीच्या घटनांपैकी १४४ आगीच्या घटना या फटाक्यांमुळे लागल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी १० नोव्हेंबरला आगीच्या १०२ घटनांपैंकी फटाक्यांमुळे लागलेल्या आगींच्या घटना या केवळ २४ एवढ्या होत्या.

https://www.prahaar.in/2026/11/12/wastage-of-water-commissioners-orders-flouted-vehicles-being-washed-on-the-streets-using-water-pumped-via-motors/

तर पाण्याची समस्या निर्माण होणारच ना!

पाच दिवसांमध्ये एकूण ५०० आगींच्या घटनांपैंकी ३३३ आगी या केवळ फटाक्यांमुळे लागलेल्या असतानाच या आगी विझवण्यासाठी पाणीच उपलब्ध नव्हते अशी टिका आणि आरोप अग्निशमन दलावर होवू लागली आहे. परंतु, एकाच वेळेला आगीच्या घटना सर्वच परिसरात वाढल्याने पाण्याची समस्या निर्माण होणारच ना! म्हणून जवळपास उपलब्ध असलेल्या ठिकाणांवरील पाणी उचलून वाहून नेत आग विझवणे हे पहिले कर्तव्य पार पाडले गेले. अग्निशमन दलाचे सर्व वॉटर फायर टँक भरलेले असतात, परंतु एकाच वेळेला आगी लागल्याने जसे मिळेल तिथून पाण्याचे फायर टँक भरण्यात आले. याचा अर्थ पाणी मिळाले नाही असे होत नाही. जर पाणी वेळेत मिळाले नसते तर आगी अधिक भडकून मनुष्य आणि वित्तहानी अधिक झाली असती. पण आग नियंत्रणात आणणे जिवितासह मालमत्तांचे रक्षण करणे हे अग्निशमन दलाचे प्रथम कर्तव्य असल्याने पाणी जिथून मिळेल तिथून भरले याचा अर्थ चुकीचा काढणे संयुक्तिक नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ठाण्याला फक्त हायड्रोलिक लॅडर पाठवली

मुंबईत आगीच्या घटना घडत असतानाच आपले फायर टँकर इंजिन हे ठाण्याला नेल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. परंतु ठाण्याला लागलेली इमारतीची आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे वॉटर फायर इंजिन पाठवलेले नसून त्यांना तिथे केवळ हायड्रोलिक फायर लॅडर पाठवली होती आणि त्या लॅडरचा वापर कसा करावा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक अधिकारी पाठवला होता. परंतु या व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाची वाहने, फायर इंजिन तसेच जवान ठाण्याला पाठवण्यात आले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी चुकीची माहिती देत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या कामांबाबत शंका उपस्थित करत राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

Image in Meta AI response

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here