मेलबर्न (ऑस्ट्रेलिया): आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत असून, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅबुशेन याच्यावर खराब फॉर्ममुळे मोठी कारवाई करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या महत्त्वाच्या ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ मालिकेसाठी लॅबुशेनचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आलेला नाही. गेल्या काही महिन्यांत त्याच्या फलंदाजीत कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत लॅबुशेनला संघर्ष करावा लागला होता. या मालिकेत त्याला सहा डावांत मिळून केवळ 131 धावा करता आल्या होत्या. विशेष म्हणजे, 2023 पासून पुढे त्याला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. एकेकाळी 2021 मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला लॅबुशेन घसरत घसरत आता थेट 40 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजीत चिंतेचे वातावरण होते.
https://www.prahaar.in/2026/11/08/england-cricket-major-blow-star-pacer-josh-tongue-ruled-out-of-series-against-australia-due-to-injury/
निवड समितीच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण
या मोठ्या निर्णयावर भाष्य करताना निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले की, 9 डिसेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत लॅबुशेनचा विचार केला जाणार नाही. संघात त्याच्या स्थानावरून बरीच चर्चा सुरू होती, त्यामुळे हा निर्णय त्याला थोडी मोकळी जागा आणि विश्रांती देईल. तसेच ‘शेल्ड’ क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तर्कवितर्कांना या निर्णयामुळे पूर्णविराम मिळेल, असेही बेली यांनी स्पष्ट केले. मात्र, लॅबुशेनचे करिअर संपले नसून तो भविष्यात कमबॅक करू शकतो, असे संकेतही बेली यांनी दिले. 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असून त्यात भारत आणि इंग्लंड दौऱ्यांचा समावेश आहे. त्या दौऱ्यांवर लॅबुशेन पुन्हा पुनरागमन करू शकतो, असे त्यांनी सांगितले. “मार्नस जेव्हा सर्वोत्तम लयीत असतो, तेव्हा तो किती प्रभावी ठरतो हे आम्हाला माहीत आहे. मात्र, मोठ्या खेळी करण्याची त्याची सातत्यपूर्ण क्षमता सध्या दिसत नाही. पण आम्ही कोणालाही कायमचे वगळलेले नाही,” असे बेली यांनी जोडले.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने अद्याप आपला अंतिम संघ जाहीर केलेला नाही. आगामी आठवडाभरात संघ जाहीर केला जाईल, ज्यामध्ये काही नवीन खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.