Home ताज्या घडामोडी GMLR प्रकल्पांतर्गत ‘विहार’ टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

GMLR प्रकल्पांतर्गत ‘विहार’ टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

0
GMLR प्रकल्पांतर्गत ‘विहार’ टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट
फोटो सौजन्य: @mybmc (X Account)

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जमिनीखालून बांधण्यात येणाऱ्या दुहेरी भूमिगत बोगद्याच्या कामामध्ये महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात BMC ला यश आले आहे. या दुहेरी बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘तुळशी’ या TBM मशीनच्या (Tunnel Boring Machine –TBM) माध्यमातून आतापर्यंत 270 मीटर बांधकामाचा टप्पा पूर्ण करण्यात यश आलं आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी सज्ज असलेल्या ‘विहार’ या TBM मशीनच्या माध्यमातून कालपासून अर्थात शनिवार,7 नोव्हेंबर 2026 पासून प्रत्यक्ष खोदकामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्हीही बोगद्यांच्या निर्मितीच्या कामाला अखेर गती प्राप्त झाली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/08/shahad-railway-flyover-project-set-to-begin-soon-major-traffic-relief-expected-for-kalyan-and-ulhasnagar/

गोरेगाव- मुलुंड लिंक रोड हा बीएमसीच्या क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा 12.20 किमी लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव पूर्वेतील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिमेतील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 5.34 किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी पहिल्या बोगदा खणन मशीनचे नामकरण ‘तुळशी’ आणि दुसऱ्या बोगदा खणन मशीनचे नामकरण ‘विहार’ असे करण्यात आले आहे. संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया आणि चाचणी पूर्ण झाल्यानंतरच 17 ऑगस्ट 2026 रोजी ‘तुळशी’ मशीनच्या कामाला सुरूवात करण्यात आली.

 

‘तुळशी’ बोगदा खणन मशीनने आतापर्यंत गोरेगावकडून मुलुंडच्या दिशेने 270 मीटरपेक्षा अधिक लांबीचे खोदकाम पूर्ण केले आहे. तर, दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘विहार’ या बोगदा खनन मशीनची स्थळ स्वीकृत चाचणी (Site Acceptance Test) नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर, कालपासून (शनिवार- 7 नोव्हेंबर 2026) दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाला अधिकृतपणे सुरूवात करण्यात आली आहे. ‘विहार’ बोगदा खनन मशीनसुद्धा ‘तुळशी’ प्रमाणेच अत्याधुनिक सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (Single Shield Earth Pressure Balance – EPB) तंत्रज्ञानावर आधारित आहे.

https://www.prahaar.in/2026/11/08/minister-mangalprabhat-lodha-celebrated-diwali-in-a-tribal-hamlet-by-giving-gifts-to-the-little-children/

‘विहार’ मशीनच्या कटर हेडचा व्यास 14.49 मीटर असून संपूर्ण मशीनची लांबी 83 मीटर इतकी आहे. यामध्ये 22 मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि तीन मजली रचनेचा 61 मीटर लांबीचा बॅकअप गॅन्ट्री विभाग समाविष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खोदकाम करताना बोगद्याच्या अग्रभागातील मातीचा दाब नियंत्रित ठेवता येतो. परिणामी, जमिनीची स्थिरता राखून सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने बोगद्याचे खोदकाम करणे शक्य होते. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here