Maharashtra Political News: राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, मराठवाडा परिसर आणि विदर्भासह राज्याच्या मोठ्या भागात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम 5 हजार रुपयांची मदत करत आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचायला सुरुवात झाली आहे. एक कोटीच्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा होत आहेत. फुल ना फुलाची पाकळी म्हणून सरकारकडून दिवाळीच्या तोंडावर ही मदत केली जात आहे. तसेच कर्जमाफीची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. या पुढे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. आजवर राज्याच्या इतिहासात एकाही मुख्यमंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली नव्हती, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केले. आज झालेल्या भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना, राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाच्या विषयात संजय राऊत यांनी नाक खुपसायची गरज काय, असा थेट सवाल करत नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करायचे की नाही, याचा निर्णय सुनेत्राताई पवार यांना घ्यायचा आहे आणि त्याला भाजपाचे पूर्ण समर्थन असेल. राहिला प्रश्न शरद पवारांचा तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम आहेत. शरद पवारांची गुलामी करण्याचे काम संजय राऊत यांनी अनेक वर्षं केले आहे. परंतु शरद पवार स्वतःचा निर्णय संजय राऊत यांच्या माध्यमातून सांगणार नाहीत एवढे ते सक्षम आणि ताकदवान नेते नक्कीच आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे त्यांचा गट काँग्रेसमध्ये दिवाळीला विलीन करणार, डिसेंबरमध्ये विलीन करणार, की पुढच्या एप्रिलमध्ये विलीन करणार, याचा मुहूर्त पंचांगातून सांगावा, एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
https://www.prahaar.in/2026/11/07/on-one-hand-i-have-come-to-live-at-the-bandekar-household-while-on-the-other-i-have-made-a-place-in-the-audiences-hearts-as-shivani-kadam-pooja-birari/
तसेच, पार्थ पवारांवर बोलण्यापेक्षा आपल्या युवराज आदित्य ठाकरेंचा इतिहास काय आहे, ते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावे. उबाठा गटामध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हा सामना महाराष्ट्रात अनेक वर्षं पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे संजय राऊतांना किती किंमत देतात? ते संजय राऊतांची कॉलर पकडतात. दोघांमध्ये हमरीतुमरी झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून महाराष्ट्राला कळाल्या आहेत. आदित्य ठाकरेंना कंटाळून एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांसह बाहेर पडले. त्या आदित्य ठाकरेंना कंटाळून संजय राऊत यांच्यासह अख्खा उबाठा गट काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आता आली आहे. दुर्दैवाने असा सामना राष्ट्रवादीत व्हावा, अशी संजय राऊत यांची इच्छा असली तरी सुनेत्राताई पवार यांचे नेतृत्व खंबीर आहे. त्या राष्ट्रवादीला एकसंघ ठेवतील
दरम्यान, संजय राऊतांना हसन मुश्रीफ यांच्याविरोधात खटला चालवायचा असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील पुरावे एकत्रित करून उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. न्यायालये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून चालत असल्याचे वाटत असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घ्यावी. तेथे ट्रम्प यांची माणसे असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांच्याजवळचे असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानच्या न्यायमूर्तीकडे याचिका दाखल करावी. आवश्यकता भासल्यास भांडुपच्या गाढव नाक्यावर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आमरण उपोषणाला बसावे. त्यासाठी त्यांना ना मुश्रीफ यांनी रोखले, ना भाजपाने रोखले ना राष्ट्रवादी काँग्रेसने रोखले आहे, असे नवनाथ बन यांनी सुनावले.