वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक माणुसकीला कलंक फासणारी घटना समोर आली आहे. राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. (Rohit Pathare )
जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाला अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान गंभीर जखमी झालेल्या या तरुणाने पिण्यासाठी पाणी मागितले असता, आरोपींनी त्याच्या तोंडात लघवी केल्याचा संतापजनक आरोप करण्यात आला आहे. वैजापूरमधील या क्रूर प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/07/nashik-strict-police-surveillance-in-the-midc-area-of-nashik-during-the-diwali-holidays-night-patrols-to-be-increased-in-satpur-ambad/
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पठारे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हेही दाखल झाले होते. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला पुन्हा दोन्ही गटांत संघर्ष उफाळला. यावेळी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. याच संघर्षात रोहित पठारे याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असताना ३ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला.
26 जणांवर गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी मृत रोहितची पत्नी शीतल रोहित पठारे यांच्या फिर्यादीवरून २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रोहितच्या कुटुंबीयांनी आरोपींना मदत केल्याचा आणि सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी रोहितच्या कुटुंबियांनी केली आहे.
या प्रकरणातील पोलिसांच्या तपासावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. सध्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींच्या शोधासाठी पाच पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पीडित कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर
सामाजिक न्याय विभागामार्फत पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची तातडीची मदत देण्याची घोषणा संजय शिरसाट यांनी केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.