मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अजित पवार यांचे निधन झाल्याने हा विषय मागे पडला. मात्र, अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या आणि त्यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीखही निश्चित झाली असती, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. अजित पवार यांची दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत प्रखर इच्छा होती आणि त्या दिशेने त्यांची तयारीही सुरू होती, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
https://www.prahaar.in/2026/11/06/claim-of-nida-khanla-35-days-helper-imtiaz-jalil-main-accused-sanjay-shirsat/
विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, अजित पवार यांचे जवळचे सहकारी असल्याने त्यांनी या विषयावर आपल्याशी चर्चा केली होती. विलीनीकरणाबाबत त्यावेळी निश्चितपणे चर्चा झाली होती. त्यासंदर्भात अजित पवार यांनी आपल्याला विश्वासात घेतले होते. विलीनीकरणाची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडेल, याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती. अजित पवार यांची तीव्र इच्छाशक्ती आणि त्यांनी आपल्याशी केलेली चर्चा पाहता, १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय प्रत्यक्षात आला असता, असे तटकरे म्हणाले.
अजित पवार यांच्या निधनामुळे विलीनीकरणाचा हा विषय त्याच टप्प्यावर थांबला. ते आज असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित दिसल्या असत्या, असेही तटकरे म्हणाले.