मुंबई : सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवेचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुरू केलेल्या आरोग्य संवाद यात्रेच्या पहिल्याच दिवशी नांदेडमध्ये कारवाईचा बडगा उगारला. लोहा, मुखेड, हिमायतनगर आणि सोनखेड या तालुक्यांतील आरोग्य संस्थांच्या पाहणीदरम्यान आरोग्यसेवेत हलगर्जीपणा आणि अकार्यक्षमता आढळल्याने ११ जणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय १० जणांच्या चौकशीचे आणि चार जणांच्या बदलीचे आदेशही देण्यात आले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/06/impact-of-wall-street-decline-on-indian-markets-nifty-remains-flat-sensex-witnesses-fluctuations/
आरोग्यमंत्री आबिटकर सध्या आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. या दौऱ्यांत जिल्हा आणि तालुका पातळीवरील दवाखाने तसेच रुग्णालयांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील पाहणीदरम्यान काही ठिकाणी आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि रुग्णांना आवश्यक सेवा देण्यात येत असलेली दिरंगाई त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश दिले.
या कारवाईत सहा डॉक्टर, दोन आयडीडब्ल्यू अभियंते, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील दोन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डीपीएम) आणि दोन तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच अन्य १० जणांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार जणांच्या तातडीने बदलीचे आदेशही देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे आरोग्य विभागातील अकार्यक्षम आणि बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान पुढील जिल्ह्यांचा दौरा नियोजित असल्याने संबंधित ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी आणि कामकाजाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ वाढविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार असून, त्यात ६७४ विशेषज्ञ आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.